mlc kapil patil about reservation in private sector | Sarkarnama

एक दोन गुणांनी अपात्र होणाऱ्या उमेदवारांना खाजगी क्षेत्रात आरक्षण द्या!

संपत मोरे  
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

ते यशाच्या जवळ गेलेले असतात.

पुणे : स्पर्धा परीक्षेत एक दोन गुणांनी अपात्र होणाऱ्या उमेदवारांना खाजगी क्षेत्रात आरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी लोकतांत्रिक पक्षाचे आमदार कपिल पाटील यांनी केली आहे. 

पाटील म्हणाले, "स्पर्धा परीक्षेत जे एक दोन गुणांनी  अपात्र होतात, ते यशाच्या जवळ गेलेले असतात. त्यांनी खूप अभ्यास केलेला असतो. अशा अभ्यासू उमेदवारांना खाजगी क्षेत्रात आरक्षण देण्याची गरज आहे. या उमेदवारांसोबत खाजगी क्षेत्रात इतरांनाही आरक्षण द्यावे," असेही ते म्हणाले. 

सध्याच्या सरकारबाबत बोलताना पाटील म्हणाले,"अच्छे दिन' येणार अशा थापा मारून हे लोक सत्तेत आले आहेत. त्यांनी सांगितलेले अच्छे दिन आले का ? प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख जमा होणार होते ते झाले का? जे शक्य नव्हतं ते बोलले आणि लोकांना फसवलं."

"खाजगी क्षेत्रात विशिष्ट वर्गाचे लोक नोकरीत आहेत. तिथंही आरक्षण देण्याची गरज आहे. राज्यात २० टक्के नोकऱ्या सरकारी तर ८० टक्के नोकऱ्या खाजगी आहेत. त्यामुळे सामान्य माणसांची गरिबी दूर करायची असेल तर जिथं जास्त नोकऱ्या आहेत त्या खाजगी क्षेत्रात नोकरीत आरक्षण मिळावे. तसेच स्पर्धा परीक्षेत नापास झालेल्या उमेदवारांना खाजगी क्षेत्रात नोकऱ्या मिळाव्यात," असे पाटील म्हणाले.
 

संबंधित लेख