mla`s pa in race for sarpanch | Sarkarnama

आमदार पाचर्णेंचा पीए सरपंच होणार की माजी आमदार पवार त्याला पाडणार?

भरत पचंगे
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

शिरूर तालुक्यातील आंबळे या गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीची शिरूर तालुक्यात चर्चा आहे. आमदार बाबूराव पाचर्णे आणि माजी आमदार अशोक पवार यांच्यातील संघर्ष यामुळे पुन्हा पाहावयास मिळत आहे. गाव छोटे असले तरी त्याची चर्चा मोठी आहे. 

पुणे : पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचे स्वीय सहायक अमित सोनवणे यांनी शिरुर तालुक्यात आपले राजकीय भविष्य अजमावत वाजेवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंचपद पटकावले. त्यानंतर आता शिरुर-हवेलीचे भाजपचे आमदार बाबुराव पाचर्णे यांचे स्वीय सहायक महेश बेंद्रे यांनीही आपल्या आंबळे गावात सरपंचपदासाठी नशिब अजमावयाला सुरवात केली आहे. त्यामुळे आंबळे ग्रामपंचायत निवडणूक शिरूर तालुक्यात रंगतदार ठरली आहे.

या रंगतदार लढतीसाठी कारणही तसेच आहे. कारण हेच बेंद्रे आधी राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांची स्वीय सहायक होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या ऐन प्रचारात बेंद्रे यांनी पवार यांची साथ सोडली आणि ते पाचर्णे यांच्या गोटात गेले. या निवडणुकीत पाचर्णे यांचा विजय झाला. परिणामी बेंद्र हे त्यांचे स्वीय सहायक झाले.

अमित सोनवणे यांचा कित्ता गिरविण्याचे बेंद्रे यांनी ठरविले असून, त्यांचे नशीब उद्या इलेक्ट्राॅनिक मतदान यंत्रात बंद होणार आहे. बेंद्रे हे स्वतः सरपंच पदासाठी उभे आहेत. त्यांच्या नेतृत्त्वाखाली त्यांनी भैरवनाथ पॅनेलही उभा केला आहे. त्यांच्या विरोधात जनसेवा विकास पॅनेलचे सोमनाथ बेंद्रे हे त्यांना लढत देत आहेत. नऊ सदस्यांच्या या पंचायतीत सुमारे दोन हजार मतदार आहेत. गाव छोटे असले तरी संपूर्ण तालुक्याचे त्याकडे लक्ष लागले आहे.

बेंद्रे यांनी सरकारी योजनांचा लाभ देत गावात वीस कोटी रूपयांची कामे केल्याचा दावा केला आहे. मात्र हा त्यांचा दावा तद्दन खोटा असून एकाच रस्त्याची कामे अनेक वेळा सांगून हा आकडा फुगविल्याची टीका विरोधक करीत आहेत.

बेंद्रे यांच्याविरोधात अशोक पवार यांच्या समर्थकांनी फिल्डिंग लावली आहे. बेंद्रे यांना धडा शिकविण्यासाठी हीच संधी असल्याचे मानत तसे डावपेच त्यांनी टाकले आहेत. त्यामुळे गावात चुरस निर्माण झाली आहे. आमदार आणि माजी आमदार या दोघांसाठीही निवडणूक महत्त्वाची ठरली आहे. परिणामी गावाक सध्या आर्थिक उलाढाली मोठ्या प्रमाणात घडत आहे. या ग्रामपंचायतीचे उत्पन्न तोडके असले तरी निवडणुकीसाठी होणारा खर्च पाहून डोळे फिरण्याची वेळ आली आहे.   

 

संबंधित लेख