mla yogesh gholap farmer angry | Sarkarnama

आमदार योगेश घोलपांना उगीच मते दिली, शेतकरी संतप्त 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

पाथर्डीफाटा (जि.नाशिक) ः जर एक बंधारा दुरूस्तीची साधी मागणी पूर्ण होत नसेल आमदार आणि खासदार काय कामाचे ? असा सवाल करतानाच शिवसेनेचे आमदार योगेश घोलप यांना उगाच मते दिली अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. 

पाथर्डीफाटा (जि.नाशिक) ः जर एक बंधारा दुरूस्तीची साधी मागणी पूर्ण होत नसेल आमदार आणि खासदार काय कामाचे ? असा सवाल करतानाच शिवसेनेचे आमदार योगेश घोलप यांना उगाच मते दिली अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. 

पाथर्डी गाव म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला. येथे तीस वर्षे शिवसेनेचे माजी मंत्री बबन घोलप आणि योगेश घोलप आमदार आहेत. मात्र दीर्घकाळ प्रतीक्षा करुनही येथील शेतकऱ्यांच्या बंधाऱ्याची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे प्रतीक्षा करुन वैतागलेल्या शेतकऱ्यांनी स्वतःच श्रमदान व वर्गणीतून बंधाऱ्याचे काम पूर्ण केले. हा बंधारा आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र एक साधी मागणीही पूर्ण होत नाही. मग आमदार, खासदार काय कामाचे ? असा प्रश्‍न त्यांनी केला आहे. त्यामुळे हे श्रमदान परिसरात चर्चेचा विषय बनले आहे. 

येथील वालदेवी नदीवर 1985 मध्ये कॉंग्रेसचे मुरलीधर माने खासदार असताना जलसंपदा विभागातर्फे शिवाजी गवळी यांनी बंधारा बांधला. बंधाऱ्यामुळे पाथर्डी शिवारातील किमान 65 हेक्‍टर जमीन कायमस्वरूपी ओलिताखाली आली. 2012 मध्ये खासदार समीर भुजबळ यांनी बंधाऱ्याची पाहणी करून नवीन पुनर्बांधणीची निविदा मंजूर करून घेतली. मात्र काम झाले नाही. 2015 मध्ये पुरामध्ये हा बंधारा वाहून गेला. आमदार योगेश घोलप यांनी येथे भेट देत दुरुस्तीची घोषणा केली. मात्र, काम न झाल्याने शेतकऱ्यांनी एकत्र येत वर्गणी गोळा करून डागडुजी केली. 

यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा बंधारा वाहून गेला. आमदार घोलप, खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे त्यासाठी विनंती केली. मात्र, विविध कारणे देत हे काम झाले नाही. अखेर स्थानिक नेते रावसाहेब डेमसे, शेतकरी नेते तुषार गवळी, विष्णू डेमसे, एकनाथ शिरसाठ, लक्ष्मण शिरसाठ, संजय जाधव, निवृत्ती गवळी, भाऊसाहेब सोनवणे, नाना शिरसाठ आदींनी प्रत्येकी दहा ते वीस हजार रुपये वर्गणी काढली. सुमारे चार लाख रुपये जमा केले. श्रमदानातुन बंधाऱ्याची दुरुस्ती सुरू केली आहे. 

आमदार घोलप यांच्याशी संपर्क साधून बंधाऱ्याची गरज किती महत्त्वाची आहे, हे पटवून दिले. मात्र, त्यांनी लक्ष दिले नाही. सध्या तर ते थेट भेट घेणे दूरच फोनही उचलत नाहीत. तीस वर्षे आम्ही शिवसेनेला साथ दिली आहे. त्या बदल्यात या कामाची अपेक्षा केली होती. मात्र, तेही होत नसल्याने वाईट वाटते. 
रावसाहेब डेमसे, शेतकरी नेते. 

संबंधित लेख