MLA to wed collector in Kerala! | Sarkarnama

आमदाराचे लग्न कलेक्‍टरशी ! 

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 मे 2017

लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार महाशयांच्या दोन-तीन भेटी या आय.ए.एस. उत्तीर्ण तरुणीशी होताच ते चक्क प्रेमात पडले. आपल्या मतदारसंघाचे व्यापक हित ध्यानात घेऊन त्यांनी सध्या उप-जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या दिव्याशी लग्न करण्याचा निर्णय घेऊन टाकला आहे. 

तिरुअनंतपुरम: आमदार आणि कलेक्‍टरची वादावादी झाल्याचे आपण अनेकदा ऐकतो. लोकप्रतिनिधी आणि सनदी अधिकाऱ्यांतील संघर्षाची भारतीय राजकारणात मोठी परंपरा राहिलेली आहे. या पार्श्‍वभूमीवर केरळात कॉंग्रेसचे एक आमदार आणि महिला आयएएस अधिकाऱ्यातील गुलाबी प्रेमाची कथा चर्चेचा विषय बनली आहे. ही प्रेमकहाणी इच्छित स्थळी म्हणजे लग्न बोहल्यापर्यंत पोचली आहे. त्यामुळे राजकारण आणि प्रशासन खरोखरीच हातात हात घालून काम करणार आहे. 

 

के. एस. सबरीनाथ असे या 34 वर्षीय आमदाराचे नाव आहे. तिरुअनंतपुरमच्या उप-जिल्हाधिकारी दिव्या एस. अय्यर यांच्या प्रेमात आमदार महाशय पडले. लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार महाशयांच्या दोन-तीन भेटी या आय.ए.एस. उत्तीर्ण तरुणीशी होताच ते चक्क प्रेमात पडले. आपल्या मतदारसंघाचे व्यापक हित ध्यानात घेऊन त्यांनी सध्या उप-जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या दिव्याशी लग्न करण्याचा निर्णय घेऊन टाकला आहे. 

आमदार सबरीनाथन यांनी दिव्या अय्यर यांच्यासोबतचा आपला सेल्फी फेसबुकवर टाकला आहे. आपल्या फेसबुक वॉलवर आमदार महाशयांनी दिव्या अय्यर यांच्यासोबत पवित्र विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सबरीनाथ हे ३४ वर्षांचे तर दिव्या ३१ वर्षांच्या आहेत . फेसबुक वॉलवर हे तरुण आमदार लिहितात ""आमची भेट अशातच झाली. आमच्या भेटीगाठीतून आणि चर्चेतून आमचे विचार किती परस्परांशी मिळते जुळते आहेत याची आम्हाला जाणीव झाली.'' 

दिव्या एस. अय्यर या मूळच्या तिरुअनंतपुरमच्याच रहिवासी आहेत. त्यांनी वेल्लोरच्या ख्रिश्‍चन मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी घेतली आहे. त्यांनी न्यूरो सायन्समध्ये "एमडी' केले आहे. त्यांचे वडील शेशा अय्यर इस्रोचे निवृत्त अधिकारी आहेत. 2013 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत दिव्या यांनी देशात 48 वा क्रमांक मिळविला होता. 

 

कॉंग्रेसचे केरळातील ज्येष्ठ नेते जी. कार्तिकेयन "अरुविक्करा' विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. जी. कार्तिकेयन यांचे के. एस. सबरीनाथन चिरंजीव आहेत. सबरीनाथन यांनी तिरुअनंतपुरमच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून अभियांत्रिकी शिक्षण घेतले. त्यानंतर गुरगाव येथून एमबीए केले आहे. "टीसीएस' या नावाजलेल्या कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून ते कार्यरत होते.

परंतु वडिलांच्या अकाली निधनामुळे त्यांनी नोकरी सोडून "अरुविक्करा' विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढविली आणि त्यात ते विजयी झाले. सबरीनाथन एक वर्षानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही पुन्हा एकदा कॉंग्रेस पक्षातर्फे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. 

सबरीनाथन आणि दिव्या या दोघांच्या कुटुंबियापर्यंत हे गोड गुपित पोहोचल्यावर दोन्ही बाजूची मंडळी एकत्र बसली. दोन्ही कुटुंबीयांच्या आणि आप्तेष्टांच्या उपस्थितीत दोघांचा साखरपुडा थाटात उरकण्यात आला. पुढच्या महिन्यात म्हणजे जूनमध्ये या दोघांचे शुभमंगल सावधान  होणार असल्याचे समजते. 

संबंधित लेख