MLA Virendra Jagtap asks tough questions to power company officer | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

वीजप्रश्‍नी आमदार वीरेंद्र जगताप यांनी अभियंत्यांना धरले धारेवर

सुरेंद्र चापोरकर 
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

*

अमरावती : चांदूररेल्वे, धामनगाव, नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यात अनियमीत वीजपुरवठ्यामुळे ओलीताचे काम प्रभावीत झाले आहे. या संदर्भात जाब विचारण्यासाठी आमदार वीरेंद्र जगताप व जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी शेकडो शेतकऱ्यांसह वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंत्यांच्या दालनात दोन तास ठिय्या दिला. 

चांदूररेल्वे, धामनगाव व नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यात कृषीपंपाच्या वीजपुरवठ्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतकरी सिंचन सुविधांपासून वंचित आहेत. या संदर्भाने तत्काळ उपाययोजना करुन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी तीनही तालुक्‍यातील शेतकऱ्यांची मागणी आहे. 

मात्र भारनियमन, सतत खंडित होणारा विजपुरवठा, अनेक रोहित्र नादूरुस्त व बंद आहेत. अनेक ठिकाणी तुटलेले व लोंबकळलेले तार असल्याने जिवंत विद्युत तारांमुळे शिवारात अपघाताची शक्‍यताही बळावली आहे. काही ठिकाणी वीज तारांची चोरी झाल्याने वीजपुरवठा अनेक दिवस खंडीत ठेवला जातो, असाही शेतकऱ्यांचा आरोप आहे. 
शेतकऱ्यांच्या याच समस्यांबाबत विचारणा करण्यासाठी आमदार जगताप यांनी वीज वितरण कपंनीच्या अभियंत्यांना धारेवर धरले. मुख्य अभियंता सुचिता गुजर, कार्यकारी अभियंता दिलीप मोहोड यांची आमदारांचे समाधान करताना चांगलीच भांबेरी उडाली. यावेळी रवी बिरे, मोहन सिंघवी, अंजनसिंगीचे सरपंच अवधूत दिवे, नितीन कनोजिया, दीपक सवई, राजा तिडके यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

 

संबंधित लेख