MLA Vijay Vadettiywar demands reservation for kunabi | Sarkarnama

विदर्भात मराठा आरक्षणाचा लाभ कुणबी समाजाला द्यावा - आमदार विजय वडेट्टीवार

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 26 डिसेंबर 2018

विदर्भात मराठा समाज नगण्य असून कुणबी समाज मोठ्या संख्येने असल्याने नुकत्याच लागू केलेल्या 16 टक्के आरक्षणाचा लाभ कुणबी समाजाला देण्यात यावा, अशी मागणी विधानसभेतील कॉंग्रेसचे उपनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. 

गडचिरोली : विदर्भात मराठा समाज नगण्य असून कुणबी समाज मोठ्या संख्येने असल्याने नुकत्याच लागू केलेल्या 16 टक्के आरक्षणाचा लाभ कुणबी समाजाला देण्यात यावा, अशी मागणी विधानसभेतील कॉंग्रेसचे उपनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. 

चुकीच्या पद्धतीने जनगणना झाल्याने ओबीसी समाजाचे नुकसान होत असून शासनाने या समाजाला उद्‌ध्वस्त करण्याचे षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. गडचिरोली येथे बुधवारी (ता.26) घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य ऍड. राम मेश्राम, डॉ. नितीन कोडवते उपस्थित होते. 

आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, प्रशासनाच्या दप्तरी गडचिरोली जिल्ह्यात 18 हजार तर चंद्रपूर जिल्हात 54 हजार मराठा कुटुंब असल्याची नोंद आहे. परंतु प्रत्यक्षात या दोन्ही जिल्ह्यात एक टक्के सुद्धा मराठा समाजाची लोकसंख्या नाही, हीच परिस्थिती विदर्भातील अन्य जिल्ह्यांत असून चुकीच्या पद्धतीने सर्व्हेक्षण झाल्याने त्याचा दुष्परिणाम ओबीसी समाजाला भोगावे लागत आहेत. ओबीसी प्रवर्गात 368 जातींचा समावेश असून 19 टक्के आरक्षणाचा फायदा कुणबी समाजाला होत नाही. त्यामुळे मराठा समाजासाठी लागू झालेल्या 16 टक्के आरक्षणाचा लाभ विदर्भातील कुणबी समाजाला देण्यात यावे, अशी मागणी वड्डेटीवार यांनी केली. 

गडचिरोली येथे गुरुवारी (ता.27) आयोजित कुणबी महामोर्चाला आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.
 

संबंधित लेख