mla ulhas patil play major role in dhairysheel mane issue | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

उल्हास पाटलांनी आपल्या खांद्यावरची पताका धैर्यशील माने यांच्या खांद्यावर दिली!

सदानंद पाटील 
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

लोकसभेसाठी आमदार पाटील यांच्या नावाची चर्चा होत असतानाच स्वत: पाटील मात्र फार इच्छुक नव्हते.

कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी हातकणंगले मतदारसंघातील संभाव्य उमेदवार म्हणून शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांच्या नावाचा आग्रह  होता. मात्र धैर्यशील माने यांच्या सेना प्रवेश करुन आमदार पाटलांनी आपल्या खांद्यावरची पताका माने यांच्या खांद्यावर देवून आपली सुटका करुन घेतल्याची चर्चा सुरु आहे. 

माजी खासदार निवेदिता माने यांनी आज राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असतानाच पुत्र धैर्यशील माने यांना शिवबंधनात अडकवले. सेनेची पथाका घेवून धैर्यशील माने लोकसभा निवडणूक लढवतील, ही त्यामागची रणनिती आहे. माने यांच्या सेना प्रवेशाला सेनेचे शिरोळचे आमदार उल्हास पाटील यांचाही हातभार आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीची चर्चा सुरु आहे. आजघडीला स्वाभिमानीच्या खासदार राजू शेटटी यांना टक्‍कर देणाऱ्या सक्षम उमेदवाराची भाजपकडून चाचपणी सुरु आहे. युती गृहीत धरुन खासदार शेटटींविरोधात आमदार उल्हास पाटील यांनाच लढवण्याचे विचारमंथन सुरु आहे. किंबहुना भाजपमधील काही नेत्यांचा आग्रह आहे. आमदार पाटील हे पूर्वीचे संघटनेचेच प्रभावशाली कार्यकर्ते आहेत. शिरोळ विधानसभा मतदार संघात ते लोकप्रिय आहेत. स्वाभिमानीसह सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांशी त्यांचा चांगला संपर्क आहे. 'चटईवरचा आमदार' अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे आमदार पाटील हे खासदार शेटटींना टक्‍कर देवू शकतात, म्हणून त्यांच्या नावाचा आग्रह आहे. 

लोकसभेसाठी आमदार पाटील यांच्या नावाची चर्चा होत असतानाच स्वत: पाटील मात्र फार इच्छुक नव्हते. त्यांना विधानसभा निवडणूक लढण्यात रस आहे. त्यातच वारणा पाणीप्रश्‍न असेल किंवा शिरोळ नगरपंचायत निवडणूक, यामध्ये मित्र पक्षांशी त्यांचा टोकाचा संघर्ष झाला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत रिस्क घेण्याची त्यांची तयारी नाही. या सर्वातूनच धैर्यशील माने यांचे नाव पुढे आले. आमदार पाटील, माने गटाचा खासदार शेटटींना थेट विरोध आहे. या विरोधात जातीचे राजकारण हा कॉमन फॅक्‍टर आहे. त्यामुळे धैर्यशील माने यांना सेनेत आणण्यात आमदार पाटील यांनीही महत्वाची भूमिका पार पाडली आहे. माने यांच्या खांद्यावर लोकसभेची पताका देवून आमदार पाटील यांनी विधानसभेचा मार्ग मोकळा केला आहे.

संबंधित लेख