mla tilekar gets an opportunity to celebrate | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

आमदार योगेश टिळेकरांना पेढे वाटण्याची संधी मिळालीच!

ज्ञानेश सावंत
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

येवलेवाडी विकास आराखडा, कात्रज-कोंढवा रस्ता निविदा या वादग्रस्त ठरल्याने भाजपचे हडपसरचे आमदार योगेश टिळेकर टिकेचे धनी झाले होते. रस्त्याच्या निविदा पालिकेच्या स्थायी समितीने मंजूर केल्याने टिळेकरांनी पालिकेत पेढे वाटून आनंद साजरा केला. गेले काही दिवस राजकीय टिकेमुळे खट्टू असलेले टिळेकर अाज आनंदित झाले.

पुणे : निविदांमधील गोंधळ, गैरव्यवहार, नेत्यांच्या मर्जीतील ठेकेदार कंपन्या आणि त्यावरून उठलेल्या राजकीय वादळाच्या चक्रात फसलेला कात्रज-कोंढवा रस्ता आता अखेर मार्गावर आला. या रस्त्याच्या तब्बल दीडशे कोटी रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने मंगळवारी "ग्रीन सिग्नल'दाखविला.

राजकीय हेव्यादाव्यांमुळे गेली सात वर्षे रेंगाळलेल्या या विषयाकडे विरोधक अजूनही संशयाने पाहात असतानाच आपण पाठपुरावा केल्याने तो मंजूर झाल्याचा दावा करीत, भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांनी मात्र, पेटे वाटून आनंदोत्सव साजरा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करणार असल्याची घोषणाही टिळेकरांनी केली. या प्रकरणातील विरोधकांचे आरोप बिनबुडाचे होते, हे त्यांना कळून चुकले, असा टोलाही त्यांनी विरोधकांना हाणला.

 
या रस्त्याच्या कामाची सुमारे 215 कोटी रुपयांची मूळ योजना सुरवातीपासूनच वादग्रस्त ठरली. परिणामी, गेल्या तीन-साडेतीन वर्षात तर तीन वेळा त्याच्या निविदा रद्द कराव्या लागल्या. सत्ताधारी भाजप नेत्यांनी कामाची निविदा फुगविल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसचा होता. त्यावरून महापालिकेच्या राजकारणात बराच वादंगही निर्माण झाला. टिळेकर यांच्यासह भाजपची अनेक बडी मंडळी विरोधकांचे लक्ष ठरले होते.

विरोधकांच्या आरोपामुळे खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी हस्तक्षेप करीत रस्त्याच्या कामाच्या निविदा रद्द करण्याची सूचनावजा आदेश भाजपच्या स्थानिक कारभाऱ्यांना दिला होता. त्यामुळे ही निविदा रद्द करण्याची नामुष्की भाजपवर ओढविली होती. त्यानंतर ठेकेदार कंपन्यांवरूनही भाजप आणि विरोधकांध्ये जुंपली होती. हा राजकीय वाद अजूनही थांबलेला नसून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची मालिका सुरूच आहे.

या पार्श्वभूमीवर निविदेतील रक्कमेला कात्री लावत, यासंदर्भातील प्रस्ताव पुन्हा स्थायी समितीसमोर मांडला होता. तो मंजूर केल्याचे समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी जाहीर केला. तेव्हाच टिळेकरांनी फटाके वाजवून-साखर वाटून विजयोत्सव साजरा केला. या रस्त्यासाठी टिळेकर यांनी पोतराजाच्या वेषात स्वतः आंदोलन केले होते. या विजोयत्सवात पोतराजांनी त्यांनी आवर्जून आणले होते. या आनंदोत्सवासाठी मोठी मिरवणूक त्यांनी काढली.

 
टिळेकर म्हणाले, ""स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी या रस्त्यांचे काम होणे आवश्‍यक आहे. मात्र, केवळ श्रेय घेण्याच्या कारणावरून विरोधकांनी आडकाडी आणली होती. तरीही सातत्याने पाठपुरावा केला. त्यातील काही त्रुटी दूर झाल्या. या पुढील काळात तरी राजकारण करू नये. लोकांच्या हिताच्या कामात अशा प्रकारे अडथळे आणणे योग्य नाही. हे काम लवकर पूर्ण करण्याला प्राधान्य आहे.'' 

संबंधित लेख