mla tilekar defeats suresh ghule | Sarkarnama

आमदार टिळेकरांनी केले राष्ट्रवादीच्या सुरेश घुलेंना `चितपट`

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

राष्ट्रवादी विरुद्ध भाजप-सेना, असा रंग या निवडणुकीत चढला होता. मांजराईदेवी रयत परिवर्तन पॅनेलसाठी आमदार टिळेकर यांच्यासह कात्रज दूध संघाचे संचालक गोपाळ म्हस्के, माजी आमदार महादेव बाबर, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील आदी प्रचारात उतरले होते. तर, मांजराईदेवी ग्रामविकास पॅनेलचे प्रमुख सुरेश घुले यांनी स्वतः हा किल्ला एकांडेपणे लढविला. 

मांजरी : पुणे जिल्ह्यातील मांजरी बुद्रुकमध्ये मांजराईदेवी रयत परिवर्तन पॅनेलने राष्ट्रवादी कॉंगेसचे नेते सुरेश घुले यांच्या 25 वर्षे ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतीवरील सत्तेला धक्का दिला आहे. सरपंचपदी भाजपचे शिवराज घुले यांनी बाजी मारली असून. त्यांच्या पॅनेलने सदस्यपदाच्या 17 पैकी 12 जागांवर विजय मिळविला आहे. सुरेश घुले यांच्या मांजराईदेवी ग्रामविकास पॅनेलला केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले. 

ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची प्रथमच नागरिकांनी निवड केली. त्यामध्ये परिवर्तन पॅनेलचे उमेदवार शिवराज घुले यांनी प्रतिस्पर्धी ग्रामविकास पॅनेलचे उमेदवार कैलास घुले यांचा 447 मतांनी पराभव केला.

या ग्रामपंचायतीवर गेली पंचवीस वर्षांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुरेश घुले यांचे निर्विवाद वर्चस्व होते. सरपंचपदी निवडून आलेले उमेदवार शिवराज घुले यांनी त्यांच्याशी फारकत घेत उपसरपंचपदाचा राजीनामा देऊन भाजपचा झेंडा हाती घेतला होता. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी इतर ग्रामपंचायतींबरोबर मांजरी बुद्रुकचाही निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यावर दोन्हीही गटांनी बहिष्कार टाकला होता. त्यानंतर पुन्हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर दोन्हीही गटांकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. 

सुरेश घुले यांचे बंधू कैलास घुले, तर आमदार योगेश टिळेकर यांचे कार्यकर्ते शिवराज घुले सरपंच पदाचे उमेदवार असल्याने दोन्हीकडूनही ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. राष्ट्रवादी विरुद्ध भाजप-सेना, असा रंग या निवडणुकीत चढला होता. मांजराईदेवी रयत परिवर्तन पॅनेलसाठी आमदार टिळेकर यांच्यासह कात्रज दूध संघाचे संचालक गोपाळ म्हस्के, माजी आमदार महादेव बाबर, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील आदी प्रचारात उतरले होते. तर, मांजराईदेवी ग्रामविकास पॅनेलचे प्रमुख सुरेश घुले यांनी स्वतः हा किल्ला एकांडेपणे लढविला. 

मांजरी ग्रामपंचायतीसाठी माझ्या माध्यमातून पहिल्यांदाच मंजूर झालेली सुमारे शंभर कोटी रुपयांची कामे व होऊ घातलेल्या विकासाची दिशा मतदारांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी आम्हाला विजयाचा कौल दिला आहे. विरोधकांच्या नकारात्मक प्रचाराचा फायदा परिवर्तन पॅनेलला झाल्याचे आमदार योगेश टिळेकर यांनी सांगितले.

मतदारांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. सरपंचपदाच्या लढाईत पराभव झाला असला, तरी आमचे सर्व कार्यकर्ते व कुटुंब जनतेच्या सेवेत कोठेही खंड पडू देणार नाही, असे सुरेश घुले यांनी नमूद केले.

मांजराईदेवी रयत परिवर्तन पॅनेलचे विजयी उमेदवार व कंसात त्यांना मिळालेली मते : पुरुषोत्तम धारवाडकर (1831), संजय धारवाडकर (1528), सुनीता घुले (1126), अमित घुले (1946), निर्मला म्हस्के (1745), सुमीत घुले (1741), सुवर्णा कामठे (1325), सीमा घुले (1283), समीर घुले (1242), उज्ज्वला टिळेकर (1195), नयना बहिरट (1062), प्रमोद कोद्रे (1016). 

मांजराईदेवी ग्रामविकास पॅनेलचे विजयी उमेदवार : जयश्री खलसे (1729), नेहा बत्ताले (1964), बालाजी अंकुशराव (2399), आशा आदमाने (2622), नीलेश घुले (2218). 

संबंधित लेख