चाकणमध्ये अडकेल्यांना पोचविण्यासाठी आमदार गोरेंनी केली मदत

चाकणमध्ये अडकेल्यांना पोचविण्यासाठी आमदार गोरेंनी केली मदत

चाकण : चाकणमधील मराठा आंदोलन हे बाहेरच्या मंडळींनी पेटविलेले आहे. स्थानिक मंडळींचा याच्याशी संबंध नाही. स्थानिक राजकारणाचाही वाद यात आलेला नाही, असा दावा खेडचे शिवसेनेचे आमदार सुरेश गोरे यांनी केला. गोरे यांच्या या मतदारसंघात हा प्रकार घडल्याने त्यांनी स्वतः पुढाकार घेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले. पुणे-नाशिक महामार्गावर अनेक भयभीत प्रवासी अडकले होते. त्यांच्या वाहतुकीची सोय  गोरे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली.

मराठा आरक्षणासाठी खेड तालुक्यात झालेल्या आंदोलनाला चाकण शहराला हिंसक वळण लागले. त्यातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या २५ गाड्या जाळण्यात आल्या. स्थानिक नेत्यांतील वाद यामागे आहे का, अशी चर्चा त्यामुळे सुरू झाली.

याबाबत बोलताना आमदार गोरे म्हणाले की सुरवातील मोर्चा शांततेत निघाला होता. हा मोर्चा सर्वपक्षीय होता. या मोर्चात मी देखील सहभागी झालो होतो. अखेरची काही भाषणे सुरू असेपर्यंत मोर्चा शांत होता. मोर्चा संपत असताना काही समाजकंटक टोळक्याने हिंसाचारास सुरवात केली. राॅकलचे डबे, पेट्रोल आणि इतर हत्यारे घेऊन काही तरुण आल्याचे अनेकांनी पाहिले. स्थानिक मंडळी यात नव्हती. आंदोलन करणारे सारे बाहेरचे होते. त्यांनी गाड्या पेटविण्यास सुरवात केली. मराठा आरक्षणाला सर्व समाजाचा पाठिंबा आहे. त्यामुळे यात कोणीही राजकारण करू नये.  

मराठा मोर्चाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागेल याची कुणाला कल्पना नव्हती. अचानक झालेल्या हिंसक वळणाची धग नेहमीप्रमाणे एसटीला बसली. स्थानकातील एसटी तसेच महामार्गावरील एसटी जमावाकडून जाळण्यात आल्या. दोन शिवशाही बसच्या काचा फोडल्या. यातील प्रवासी भीतीने गाड्यातून उतरले. गाड्यातून उतरलो खरे, पण अशा परिस्थितीत जायचे कुठे हा प्रश्न सर्व प्रवाशांना पडला. शिवशाहीतील तसेच एसटीतील साठ ते सत्तर प्रवाशांनी एसटी स्थानकातील वरच्या मजल्यावरील खासगी रुग्णालयाचा आसरा घेतला. वारंवार हिंसक जमाव एसटी स्थानकाच्या आवारात घोषणाबाजी करत फिरत होते. दुपारी एकच्या सुमारास हे प्रवासी अडकून पडले ते सायंकाळी साडेसहा वाजले तरी त्यांची पुण्याला जाण्याची सोय नव्हती.

अखेर आमदार सुरेश गोरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर, रामदास घनवटे, जिल्हा परिषद माजी सदस्य किरण मांजरे, लक्ष्मण जाधव यांच्यासह अनेक स्थानिकांनी प्रवासी तसेच कामगार वर्गांना घरी जाण्यासाठी मदत केली. स्वतः आमदार गोरे शहरात फिरून शांततेचे आवाहन करत होते. गोरे यांनी शिवशाहीतील पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी स्वतंत्र गाडीची सोय केली. मात्र, तरीही विद्यार्थी, कामगार, महिलांना आंदोलनाचा तडाखा बसला. जमावाच्या हिंसक कृत्याची भीती मात्र घरी जाताना सर्वांच्याच मनात होती.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com