mla shivendraraje moves in highcourt | Sarkarnama

धुमश्‍चक्री: शिवेंद्रसिंहराजे उच्च न्यायालयात! 

सरकारनामा ब्युराे
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

सातारा : टोलनाक्‍याच्या वादातून सुरूची बंगल्याबाहेर झालेल्या धुमश्‍चक्री प्रकरणी दाखल दोन्ही गुन्ह्यांतून वगळावे, अशी मागणी करणार अर्ज साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उच्च न्यायालयात दाखल केला आहे. 

सातारा : टोलनाक्‍याच्या वादातून सुरूची बंगल्याबाहेर झालेल्या धुमश्‍चक्री प्रकरणी दाखल दोन्ही गुन्ह्यांतून वगळावे, अशी मागणी करणार अर्ज साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उच्च न्यायालयात दाखल केला आहे. 

कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री सुरूची बंगल्याबाहेर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांत धुमश्‍चक्री झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार व खासदार समर्थक अजिंक्‍य मोहिते यांच्या तक्रारीनुसार आमदार शिवेंद्रसिंहराजे व त्यांच्या समर्थकांवर खुनाच्या प्रयत्नांचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी आमदार समर्थक जयेंद्र चव्हाण, फिरोज पठाण, विनोद खंदारे, विक्रम पवार यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केले आहेत. त्यावर सुनावणी होणार होती. मात्र, सरकार पक्षाने म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागितली. त्यावर संशयितांच्या वतीने तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळण्याची मागणी केली. त्याला सहायक सरकारी वकिल मिलिंद ओक यांनी विरोध दर्शविला. त्यानंतर जिल्हा न्यायाधीश श्री. चव्हाण यांनी अर्जावरील सुनावणी 27 ऑक्‍टोबरला ठेवली. त्याच दिवशी सरकार पक्षाला म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे. 

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दोन्ही गुन्ह्यातून त्यांना वगळण्यात यावे, अशी मागणी उच्च न्यायालयात केली आहे. पोलिस निरिक्षक किशोर धुमाळ व अजिंक्‍य मोहिते या दोघांच्या तक्रारीत माझे नाव आहे. मात्र, निरिक्षकांच्या फिर्यादीत खासदार उदयनराजे भोसले सुरूची बंगल्यावर आले. त्वेषाने आत शिरण्याचा प्रयत्न केला. आम्ही रोखत असतानाच गोळीबाराचा आवाज झाला. त्यानंतर त्यांना गाडीत बसविले. त्यांच्यासोबत जाणाऱ्या गाड्यांच्या धडकेत मी व पोलिस कर्मचारी जखमी झाल्याचे धुमाळ यांनी तक्रारीत म्हटले आहे. या घटनेत माझा कोणताही संबंध नाही. तसेच अजिंक्‍य मोहितेच्या फिर्यादीतील मजकुराशीही माझा संबंध नाही. त्यामुळे या दोन्ही गुन्ह्यातून माझे नाव वगळावे, अशी मागणी त्यांनी उच्च न्यायालयात केली आहे. यावर दिवाळीनंतर सुनावणी होणार आहे. 
 

संबंधित लेख