mla sharad sonawane meet udhhav thackrey | Sarkarnama

राज ठाकरेंचा हल्लाबोल सुरू असताना शरद सोनवणे उद्धव ठाकरेंना 'मनसे' वंदन करत होते!

उत्तम कुटे
शुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018

बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक महापौर बंगल्यात उभारण्यास राज ठाकरे यांचा तीव्र विरोध आहे. उद्धव ठाकरे यांना महापौर बंगला गिळायचा आहे, असा थेट आरोप राज यांचा आहे. काल मुंबईत राज यांनी स्मारकाच्या निमित्ताने हडपण्याचे आरोप नव्याने केले. त्याचवेळी पुणे जिल्ह्यात मनसेचे आमदार शरद सोनवणे हे उद्धव ठाकरेंच्या स्वागताला उपस्थित होते.

पिंपरीः राष्ट्रवादी, भाजपनंतर आता शिवसेना नेत्याशी गुफ्तगू करीत राज्यातील मनसेचे एकमेव आमदार (जुन्नर) शरद सोनवणे यांनी सगळ्यांनाच बुचकाळ्यात टाकले आहे. 'वन मॅन आर्मी' असलेल्या सोनवणेंनी ऐनवेळची राजकीय समीकरणे विचारात घेऊन कुठल्याही पक्षातून निवडणूक लढविण्यासाठी हा समन्वय राखला असल्याचा राजकीय जाणकारांचा होरा आहे. 

दरम्यान, 2019 ची निवडणूक ही त्यावेळची परिस्थिती पाहून कुणाकडून लढविणार हे ठरवू, असे सांगत शरददादांनी वरील अंदाजाला शुक्रवारी 'सरकारनामा'शी बोलताना दुजोरा दिला. तो देताना त्यांनी सर्वच राजकीय पक्षांना गुगली टाकली आहे. आपला हुकूमाचा पत्ता त्यांनी ओपन केलाच नाही.

उद्या (ता.24) अयोध्येला जाण्यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काल (ता. 22) शिवनेरीवर गेले होते. तेथील मातीचा कलश घेऊन ते अयोध्येला जाणार आहेत. या भेटीत सोनवणेंनी ठाकरे यांना वंदन केले. एवढेच नव्हे,तर त्यांच्याशी चर्चाही केली. ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलींद नार्वेकर यांच्याशीही त्यांनी हेलिपॅडवर गुफ्तगू केले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. ते पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असल्याने 2019 ला घरवापसी करणार असल्याची चर्चाही सुरु झाली आहे. शिवसैनिक असलेल्या सोनवणेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न यावेळी ठाकरे यांनी केल्याचे समजते. तसेच त्यांना 'मातोश्री' भेटीचे निमंत्रणही दिले असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

प्रथम राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, नंतर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या जुन्नर दौऱयात सोनवणेंनी त्यांचे स्वागतच केले नाही. तर, अगदी जवळीक सुद्धा केल्याने तो चर्चेचा विषय झाला होता. तर, गुरुवारीही मुंबईतील अधिवेशन सोडून ते ठाकरेंच्या स्वागताला शिवनेरीवर आले होते. या सर्वांशी त्यांनी गुफ्तगू केले होते. त्यावर उठलेल्या वावटळीचा आज (ता.23) त्यांनी खुलासा केला. स्थानिक आमदार म्हणून या सर्वांचे स्वागत करणे ही माझी संस्कृती व कर्तव्य आहे. ती मी जपतोय. समन्वय साधतोय. 

सर्वच पक्ष नेत्यांशी होत असलेले गुफ्तगू पाहता आगामी विधानसभा निवडणूक कोणत्या पक्षाकडून लढणार असे थेट विचारले असता हा गुगलीही सोनवणेंनी खुबीने परतवला. आपला हुकमाचा पत्ता त्यांनी ओपन केला नाही. त्यावेळची समीकरणे पाहून ठरवू, असे ते म्हणाले. मनसे महाआघाडीत जाणार का वा शिवसेना-भाजप युती होणार का यावर आपण कोणाकडून लढणार हे ठरवू, असे सांगत त्यांनी हा पेच आणखी बिकट केला. त्यामुळे कार्यकर्त्यांतील संभ्रमही वाढला आहे. त्याचवेळी पक्षाच्या अडचणीच्या काळात तिकिट पक्के असताना पक्ष सोडणे पळपुटेपणा ठरेल, असेही ते म्हणाले. 

संबंधित लेख