MLA Satej Patil's Criticism on Kolhapur MP | Sarkarnama

लग्न राष्ट्रवादीशी आणि संसार भाजपशी : कोल्हापूरच्या खासदारांवर सतेज पाटील यांची टीका

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 3 सप्टेंबर 2018

'आगामी निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे घ्या; अशी भूमिका जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने काँग्रेसचा आमदार म्हणून पक्षाच्या व्यासपीठावर मांडली. पक्षश्रेष्ठींकडे कोणती मागणी करायची, याचा आम्हाला अधिकार आहे; पण ही भूमिका मांडल्याने रंगबदलू सरडा खासदारांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे,' अशी टीका  आमदार सतेज पाटील यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

कोल्हापूर : 'आगामी निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे घ्या; अशी भूमिका जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने काँग्रेसचा आमदार म्हणून पक्षाच्या व्यासपीठावर मांडली. पक्षश्रेष्ठींकडे कोणती मागणी करायची, याचा आम्हाला अधिकार आहे; पण ही भूमिका मांडल्याने रंगबदलू सरडा खासदारांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे,' अशी टीका  आमदार सतेज पाटील यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

''2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका तसेच अन्य निवडणुकीत या खासदारांनी सर्वांचाच विश्‍वासघात केला. प्रत्येक निवडणुकीत स्वार्थासाठी सोयीची भूमिका घ्यायची आणि कार्यकर्त्यांचा विश्‍वासघात करण्याची सवय काका-पुतण्याला लागली आहे. सध्या स्वत:ला राष्ट्रवादीचे खासदार म्हणवून घेणारे हे खासदार राष्ट्रवादीच्या कार्यालयात किती वेळा आले? राष्ट्रवादीच्या किती कार्यक्रमांना व बैठकांना ते उपस्थित राहिले, याचा हिशेब त्यांनी कार्यकर्त्यांना द्यावा.'' असेही त्यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीची खासदारकी मिळाल्याने त्यांचे लग्न जरी राष्ट्रवादीशी झाले असले, तरी चार वर्षांत या खासदारांनी भाजपशी जवळीक करून संसार थाटला आहे. त्यामुळेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्य सहकारी बॅंकेकडून पंढरपूरच्या कारखान्याला 65 कोटी रुपये दिले आहेत. सध्या भाजपविरोधी वातावरण तयार झाल्याने हे खासदार पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या वळचणीला आले असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

पत्रकात ते पुढे म्हणतात, '2009 मध्ये काका-पुतण्यांनी खासदार संभाजीराजे यांच्या विरोधी प्रचार करून छत्रपती घराण्याचा व कोल्हापूरच्या गादीचा आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा 'विश्‍वासघात' केला. लोकसभेला मी गल्लीबोळात फिरून त्यांच्यासाठी मते मागितली. पण लगेच विधानसभा निवडणुकीत त्यांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसून विश्‍वासघात केला. शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना खासदार करण्यासाठी लोकांचे उंबरे झिजवले. पण महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या कोणत्याही उमेदवाराचा प्रचार केला नाही. उलट भाजप-ताराराणीच्या उमेदवारांच्या विजयासाठी ताकद लावली. भाजपकडून भावजयीला अध्यक्ष करण्यासाठी 'भाजप'च्या जिल्हा परिषद सदस्यांच्या बसचे 'नन्हे मुन्हे' ड्रायव्हर झाले, आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांचा विश्‍वासघात केला.' 

मुश्रीफ यांचाही विश्‍वासघात
2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी सर्व जोडण्या लावून 'त्यांना' खासदार केले. निवडून आल्यावर या सरडा खासदारांनी मुश्रीफ यांच्या पायावर लोटांगण घालून डोके ठेवले. पण खासदारकीची धुंदी चढताच त्यांनी स्वत:च्या जीवावर मी खासदार झालोय, अशी भाषा बोलून मुश्रीफ यांचासुद्धा विश्‍वासघात केला असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.

संबंधित लेख