MLA Sanjay Shirsat makes allegations against MLA Prashant Bamb again | Sarkarnama

प्रशांत बंब यांच्यावर फसवणूक, खंडणी, दरोड्याचे गुन्हे : संजय शिरसाट यांचा पुन्हा आरोप 

सरकारनामा
बुधवार, 11 जुलै 2018

प्रशांत बंब यांच्या या प्रकाराबद्दल दोन वर्षांपूर्वीच आपण मुख्यमंत्र्यांना "हिंट' दिली होती. माझे बंब यांच्याशी वैयक्तिक वैर नाही. पण इतरांच्या मतदारसंघात हस्तक्षेप करणे चुकीचे आहे. भ्रष्टाचार झाला म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात  लोकांच्या तक्रारी करणे योग्य नाही. कशाच्या आधारावर तुम्ही आरोप करता, तुम्हाला स्वप्न पडले का भ्रष्टाचार झाल्याचे? खोटी बिले उचलणारे अधिकारी घरी जाणार नाहीत का? खोट्या तक्रारी करणे हा बंब यांचा मूळ स्वभाव आहे. 

औरंगाबाद : भाजपचे आमदार प्रशांत बंब हे ब्लॅकमेलरच आहेत हे त्यांच्यावर राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांवरून सिध्द होते. फसवणूक, खंडणी, दरोड्यासारखे गंभीर गुन्हे बंब यांच्या विरोधात नोंदवण्यात आलेले आहेत. 2014 मध्ये विधानसभा निवडणूक लढवण्यापूर्वी दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांनी स्वतःच ही माहिती दिल्याचा आरोप  शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी  नागपूर विधीमंडळ अधिवेशनात प्रसार माध्यमांशी बोलतांना केला. 

गंगापूर-खुल्ताबाद मतदारसंघाचे भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्यासह संदीपान भुमरे, सुभाष साबणे, बालाजी किणीकर, तानाजी मुटकुळे, आष्टीकर, प्रताप पाटील चिखलीकर, अब्दुल सत्तार, मोहन फड या सर्वपक्षीय आमदारांनी ब्लॅकमेलिंगचा आरोप केला होता. या आरोपांचे खंडण करतांना बंब यांनी संबंधित आमदारच कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारात सहभागी असल्याचा पलटवार केला. माझ्या विरोधात पुरावे द्या, असे आव्हानदेखील त्यांनी आरोप करणाऱ्या आमदारांना दिले होते. 

या संदर्भात शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आज प्रशांत बंब यांच्या विरोधात दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांचे पुरावे घेऊन प्रसार माध्यमांना सामोरे गेले. प्रशांत बंब यांची मानसिकताच ब्लॅकमेलिंगची असल्याचा आरोप शिरसाट यांनी यावेळी केला. ते म्हणाले, की प्रशांत बंब यांना स्वतःच्या मतदारसंघात फिरायला वेळ नाही, लग्न-कार्यात सहभागी होण्यास वेळ नाही. मात्र, इतरांच्या मतदारसंघातील कामांची माहिती गोळा करून अधिकारी, कंत्राटदारांना ब्लॅकमेल करण्यास भरपूर वेळ आहे. 

सर्वच पक्षाच्या आमदारांनी प्रशांत बंब यांच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांकडे त्यांची तक्रार केली तेव्हा माझ्या विरोधात पुरावे द्या, अशी ओरड बंब यांनी सुरू केली होती. आज माझ्या हाती त्यांच्या विरोधात पुरावे आले आहेत. त्यांनी दिलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्यावर औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर, जळगावसह अनेक जिल्ह्यांमध्ये फसवणूक, खंडणी आणि दरोड्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यावरून त्यांची मानसिकताच ब्लॅकमेलिंगची असल्याचे स्पष्ट होते. 

सगळ्यांनाच त्याचा त्रास असल्याने एखाद्या आमदाराच्या विरोधात एवढे सदस्य एकत्रित येणे ही इतिहासातील पहिली घटना असेल. बंब यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी अनेकजण न्यायालयात जाण्याच्यादेखील तयारीत आहेत. माझे त्यांना आमने-सामने येऊन "टॉक शो' करण्याचे खुले आव्हान आहे. वेळ पडल्यास सभागृहातदेखील आपण हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे संजय शिरसाट यांनी सांगितले. 

------------------------------------------------------------------------

सगळ्या गुन्ह्यातून मी निर्दोष सुटलो, आरोप करणारे बिथरले आहेत : प्रशांत बंब 

http://www.sarkarnama.in/i-have-been-absolved-all-cases-mla-prashant-bam...

संबंधित लेख