mla rajesh kshirsagar criticise satyajeet kadam ghosalkar | Sarkarnama

त्या निवडणुकीत त्यांचा 'घोसाळकर' झाला: आमदार क्षीरसागर 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018

खोट्या आरोपांविरोधात मी सत्यजित कदम यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार.

कोल्हापूर : आमदार निधी खाजगी लेआउटला खर्च झाला आहे, असा आरोप करणाऱ्या सत्यजित कदम (घोसाळकर) यांना मानसोपचार तज्ञाची गरज आहे. त्यांच्यावर अब्रुनुकसानिचा दावा करणार असल्याचे पत्रक आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिध्दीस दिले आहे. 

भाजप-शिवसेना युती होणार नाही असे गृहीत धरून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजप कडून आमदारकी लढवायची, या अपेक्षेने सत्यजित कदम आरोप करत आहेत. परंतु, दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून युती बाबत होत असलेली सकारात्मक वक्तव्ये किंवा युती न झाल्यास पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दुसराच उमेदवार भाजपकडून घोषीत केल्याने, सत्यजित कदम यांचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असून, वैफल्यातून असे बिनबुडाचे आरोप करीत सुटले आहेत. या खोट्या आरोपांविरोधात मी सत्यजित कदम यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रक प्रसिद्धीस दिले आहे. 

निवडणूक जवळ आली कि पावसाळ्यात उगविणाऱ्या छत्र्याप्रमाणे असे खोटे आरोप करून प्रसिद्धी मिळवायची असे बिनकामी उद्योग करण्यात सत्यजित कदम घोसाळकर माहीर आहेत. महिला कर्मचाऱ्याशी असभ्य वर्तन, रिक्षाव्यावसायिकाला मारहाण करून खंडणी मागणे, जीवे मारण्याची धमकी देणे अशा प्रवृत्तीच्या कदमांनी स्वतःचे आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचा टोला आमदार क्षीरसागर यांनी लावला आहे. तसेच गेली काही वर्षे सत्यजित कदमांनी एका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला लुटून जमा केलेली माया गत निवडणुकीमध्ये खर्च केली. त्या निवडणुकीत त्यांचा घोसाळकर झाला. त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडलेली आहे. पराभव सहन न झाल्याने मानसिक आजारातून त्यांनी माझ्यावर मुंबई उच्च न्यायालयामध्ये रिट दाखल केली आहे. यामध्ये मी निवडणुकीमध्ये प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती सादर न केल्याचे खोटे म्हणणे सादर केले आहे. पण, निवडणुकीमध्ये आम्ही जिल्हापोलीसप्रमुखांकडून दाखल असलेल्या गुन्हांची माहिती मागवून सदर माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात सादर करतो. त्याप्रमाणे ही सर्व माहिती आम्ही निवडणूक आयोगाकडे सादर केली असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
 

संबंधित लेख