mla rajan salvi criticise ashok walam | Sarkarnama

वालम हे छोटे व्यक्तिमत्त्व; स्वतःच्या अस्तित्वासाठी शिवसेनेला टार्गेट करतात!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

भविष्यात समितीच्या धरणे आंदोलनांमध्ये सेना सहभागी होणार नाही,

राजापूर : रिफायनरीविरोधात संघर्ष समितीच्या धरणे आंदोलनामध्ये शिवसेना सहभागी झाली होती. मात्र वारंवार टार्गेट केले जात असेल, तर भविष्यात समितीच्या धरणे आंदोलनांमध्ये सेना सहभागी होणार नाही, अशी रोखठोक भूमिका आमदार राजन साळवी यांनी जाहीर केली.

छोटे व्यक्तिमत्त्व असलेल्या अशोक वालम यांनी शिवसेना पक्षासह त्या पक्षाच्या नेत्यांवर टीका-टिप्पणी करणे योग्य नाही. कोणताही राजकीय वारसा नसलेले वालम शिवसेनेला वारंवार टार्गेट करत स्वतःचे राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

कोकण रिफायनरी प्रकल्पविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष वालम यांनी सोमवारी (ता. 13) पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा त्यांनी शिवसेनेला टार्गेट केले होते. त्याला आमदार श्री. साळवी यांनी आज पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. रिफायनरी प्रकल्प उभारणीला शिवसेनेचा विरोध असून भविष्यामध्येही कायम राहणार आहे. प्रकल्पासाठी आवश्‍यक असलेले भूसंपादन रद्द करण्याच्या घोषणा करणारे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भूसंपादन रद्द करण्याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केंद्राकडे पाठविला आहे. त्यामुळे प्रकल्प रद्दची पुढील प्रक्रिया करण्याची जबाबदारी असलेल्यांच्या विरोधात रान उठविण्याऐवजी वालम यांनी सेनेला टार्गेट करणे योग्य नाही, असे साळवी यांनी सांगितले. 

भविष्यामध्ये कोकण रिफायनरी प्रकल्पविरोधी संघर्ष समितीने छेडलेल्या आंदोलनामध्ये सहभागी होण्याऐवजी सभागृहामध्ये आणि रस्त्यावर स्वतंत्र आंदोलन छेडू असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला सेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, शहरप्रमुख संजय पवार, पंचायत समिती सभापती अभिजित तेली आदी उपस्थित होते. 
 
आगामी निवडणुकीमध्ये भाजपसोबत युती करण्याचा आणि त्यानंतर जागा वाटपाचा निर्णय घेण्यापूर्वी रिफायनरी रद्द करण्याची अट शिवसेनेने ठेवावी, अशी मागणी वालम यांनी केली. त्याबाबत साळवी म्हणाले की, निवडणुकीसंबंधी कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार "मातोश्री'ला आहे. त्याबाबत वालम यांनी सल्ला देण्याची गरज नाही. अयोध्येमध्ये राम मंदिर उभारण्याबाबतची शिवसेनेची भूमिका आग्रही आहे. 

संबंधित लेख