MLA Rajale get free way to become Minister | Sarkarnama

आमदार मोनिका राजळे यांना मंत्रीपदाची कर्डिले यांनी करुन दिली मोकळी वाट?

मुरलीधर कराळे
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

निवडणुकांना थोडेच दिवस राहिले आहेत. शेवटच्या टप्प्यात तरी आमदार मोनिका राजळे यांना मंत्रीपद मिळावे, अशी मागणी पाथर्डी-शेवगावमधून होत आहे. आमदार राजळे आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे सलोख्याचे संबंध पाहता राजळे यांच्यासाठी पंकजा मुंडे मुख्यमंत्र्यांकडे शब्द टाकणार का, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.

नगर : मंत्रीमंडळाच्या विस्तारात आमदार मोनिका राजळे यांना मंत्रीमंडळात संधी मिळावी, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत असताना आमदार शिवाजीराव कर्डिलेही मंत्रीपदाचे दावेदार आहेत. त्यामुळे संधी मिळाल्यास एकाला मिळू शकते, अशी शक्यता आहे. असे असतानाच नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात राजळे या मंत्री व्हाव्यात, अशी अपेक्षा कर्डिले यांनी व्यक्त केल्याने त्यांनी राजळेंना मंत्रीपदाची वाट मोकळी करून दिल्याचे बोलले जाते.

निवडणुकांना थोडेच दिवस राहिले आहेत. शेवटच्या टप्प्यात तरी आमदार मोनिका राजळे यांना मंत्रीपद मिळावे, अशी मागणी पाथर्डी-शेवगावमधून होत आहे. आमदार राजळे आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे सलोख्याचे संबंध पाहता राजळे यांच्यासाठी पंकजा मुंडे मुख्यमंत्र्यांकडे शब्द टाकणार का, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, शेवगाव – पाथर्डी मतदारसंघात आमदार राजळे यांनी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराप्रसंगी आमदार शिवाजी कर्डिले यांनी राजळे यांना उद्देशून पुढील वेळीही राजळे आमदार होतीलच, शिवाय त्यांना मंत्रीपदही मिळेल, असे सांगितले. त्यावर प्रा. शिंदे यांनी कर्डिलेसाहेब, तुमची परवानगी असेल, तर राजळे मंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत, असे सांगून राजळे यांना मंत्रीपदाची वाट कर्डिले यांनी मोकळी करून दिले, असे अप्रत्यक्षरित्या जाहीर करून टाकले होते. त्यामुळे प्रा. शिंदे यांच्या बोलण्याचा अर्थ राजळे यांना मंत्रीपद मिळेल, असा समजून शेवगाव – पाथर्डी मतदारसंघात राजळे यांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष आता मंत्रीमंडळाच्या विस्ताराकडे लागले आहे.

आता मंत्रीपद हुकलेच म्हणून समजा
श्रीगोंदे येथे आज (बुधवारी) झालेल्या कार्यक्रमात आमदार कर्डिले व राहुल जगताप एकाच व्यासपीठावर होते. या वेळी जगताप यांनी कर्डिले यांची कारखान्यास मोठी मदत झाली, असे सांगून त्यांचे काैतुक केले. त्यावर कर्डिले यांनी बोलताना आधीच आमच्या वाईटावर अनेकजण टपले आहेत. आता तुम्ही काैतुक करून कशाला मला पुढे करता. हे कौतुक ऐकून आता तर मंत्रीपद हुकलेच म्हणून समजा, असे सांगून कर्डिले यांनी आपले मंत्रीपद हुकण्याच्या शक्यतेला पुष्टी दिली.
 

संबंधित लेख