MLA Pacharne criticizes Ajit Pawar | Sarkarnama

अजितदादा, टीका करण्यापेक्षा मुख्यमंत्री जनतेतून निवडण्याचा ठराव आणा : पाचर्णे 

भरत पचंगे
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

राज्यात सरपंच आणि काही महापालिकांत महापौर थेट जनतेतून निवडण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर अजित पवार जोरदार टीका करीत आहेत. त्याला शिरूरचे भाजपचे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानही मग जनतेतून निवडा, अशी उपरोधिक मागणी पवार करीत आहेत. पाचर्णे यांनी ही मागणी योग्य ठरवली आहे. 

शिक्रापूर : "अजितदादा, जनतेतून सरपंच निवडण्याचा धाडस निर्णय भाजपने घेतला. आता मुख्यमंत्री जनतेतून निवडण्याचालाही आमची तयारी आहे. हिम्मत असेल तर येत्या अधिवेशनात मागणी करा, मी स्वत: पुढाकार घेईनच. त्यात तुम्हीही सहभागी व्हा,'' असे थेट आव्हान आमदार बाबुराव पाचर्णे यांनी माजी मुख्यमंत्री अजित पवार यांना आज दिले. 

आमदार पाचर्णे यांनी डिसेंबर 2015 च्या नागपूर अधिवेशनात औचित्याचा मुद्दा व मार्च 2016 मध्ये तारांकित प्रश्न उपस्थित करीत सरपंच जनतेतून निवडण्याबाबतचे प्रश्न सभागृहात चर्चेला आणले होते. यावर शासनाने समाजसेवक पोपटराव पवार यांची समिती गठीत करुन त्या समितीच्या शिफारशीनुसार जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय घेत राज्यात ग्रामपंचायत निवडणूका घेण्याचे आदेश जारी केले. या निर्णयानुसार पुणे जिल्ह्यातील पहिल्या ग्रामपंचयात निवडणूकीत काल (दि.27) बावधन बुद्रुक (ता.मुळशी) येथे जिल्ह्यातील पहिल्या जनतेने निवडलेल्या सरपंच म्हणून भाजपाच्या पियुषा दगडे निवडून आल्या. 

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्व नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हेही गेल्या काही दिवसांपासून सरपंचपदाच्या निवडीबाबत सरकारवर टीका करीत मुख्यमंत्री व पंतप्रधानही जनतेतून निवडायचा का, असा खोचक सवाल करीत आहेत. 
यावर बोलताना आमदार पाचर्णे यांनी शिक्रापूरात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले,""मी सभागृहात याबाबत प्रश्न उपस्थित केला असताना सभागृहातील बहुतांश आमदारांनी या मागणीला पाठींबा दिला होता. त्यावेळीही श्री पवार यांनी वरील प्रमाणेच टीका केली होती. मुख्यमंत्रीही मग थेट जनतेतून निवडा, अशी मागणी केली होता. त्याला आपण सभागृहातच होकार दिला होता.'' 

"केवळ सवंग लोकप्रियतेसाठी अजित पवार गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्रिपदाबाबत बोलत आहेत. तशी हिंम्मत असेल तर मुख्यमंत्री थेट जनतेतून निवडण्याची तशी त्यांनी येत्या अधिवेशानत सभागृहात करावी. आम्ही संपूर्ण भाजप आमदार या मागणीला पाठींबा देवू,'' असे पाचर्णे यांनी सांगितले. दरम्यान पंतप्रधानपदाबाबत दादांनी बोलणे उचित आहे की, नाही हे त्यांनीच ठरवावे आणि तो आधिकार फक्त शरद पवार साहेबांनाच आहे त्यांनी तो बोलावा असा चिमटाही श्री पाचर्णे काढला. 

संबंधित लेख