आमदार पाचर्णे आणि अशोक पवार यांच्यात कडाडली वीज!

घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पावरून शिरूरचे आमदार बाबूराव पाचर्णे आणि माजी आमदार अशोक पवार यांच्यात वाद-प्रतिवाद सुरू झाले आहेत. पवार यांनी घोडगंगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी पाचर्णे यांनी केली. तर आमदार हे नैराश्यतून आरोप करत असल्याचे प्रत्युत्तर पवार यांनी दिले.
आमदार पाचर्णे आणि अशोक पवार यांच्यात कडाडली वीज!

शिक्रापूर : शिरूरचे आमदार बाबूराव पाचर्णे आणि माजी आमदार अशोक पवार या दोघांत सध्या वादाची वीज कडाडली आहे. या वादाला कारणही विजेचे आहे. घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या वीजनिर्मिती प्रकल्पावरून हा वाद आहे. या विजेचा खरेदी करार राज्य सरकारने नुकताच केला. त्यावरून हा वाद पेटला आहे.

याबाबत पाचर्णे यांनी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा राज्य सरकारसोबतचा वीजखरेदी करार माजी आमदार अशोक पवार यांच्यामुळेच रखडल्याचा आरोप केला. या चुकीमुळे तालुक्‍यातील ऊस उत्पादकांना 75 कोटींचा फटका बसला आहे. नुकसानीची जबाबदारी स्वीकारून त्यांनी आपली चूक मान्य करावी व कारखान्याच्या अध्यक्षपदाचा त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केला.

भीमाशंकर व श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याचे वीजखरेदी करार सन 2012 मध्ये होतात आणि "घोडगंगा'चा मात्र होत नाही याला जबाबदार कोण? अशोक पवार कारखान्याचे अध्यक्ष व तत्कालीन आघाडी सरकारचे आमदार असतानाही कारखान्याचा वीज करार का केला नाही, याचे उत्तर त्यांनी द्यावे. विशेष म्हणजे या काळात ऊर्जामंत्री अजित पवार असतानाही हा करार न होण्याचे अपयश अशोक पवारांचे की अजित पवारांचे, हेही त्यांनी जाहीर करावे, असे आव्हान पाचर्णे यांनी दिले.
 
वीज प्रकल्पाचे कायदेशीर सोपस्कार पार पाडण्यात सन 2010 पासून दिरंगाई केली गेली. पुढे सन 2014 मध्ये संधी असूनही वीज करार टाळल्याने त्यापुढील प्रत्येक वर्षी उसाला मिळू शकणारा प्रतिटन सरासरी 300 रुपयांचा जास्तीचा भाव तालुक्यातील 20 हजारांपेक्षा जास्त ऊस उत्पादकांना मिळू शकलेला नाही. या पंचवीस लाख टन उसाचा हिशोब करता आर्थिक फटक्‍याची रक्कम 75 कोटी रुपयांची होते. ती जबाबदारी अशोक पवार यांनी घ्यावी आणि स्वत:चा खासगी कारखाना सांभाळण्यासाठी "घोडगंगा'च्या अध्यक्षपदाचा त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी पाचर्णे यांनी केली. व्यंकटेश कारखान्याच्या प्रेमापोटी अशोक पवार तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या जिवावर उठल्याचा आरोप पाचर्णे यांनी केला आहे.

याला अशोक पवार यांनी उत्तर दिले आहे. ज्यांनी घोडगंगाच्या विस्तारीकरण आणि वीजप्रकल्पालाच विरोध केला होता त्यांनी आता शरद पवार साहेबांच्या प्रयत्नाने वीज करार दृष्टीपथात आल्यावर बोलणे योग्य नाही. केवळ मोदी लाटेमुळेच निवडून आलेल्या आमदार पाचर्णेंना गेल्या तीन वर्षात एकही निवडणूक जिंकता आलेली नसल्याने त्यांचे हे सर्व आरोप राजकीय नैराश्यापोटी असून आम्ही निवडणूकांच्या निकालांद्वारेच उत्तरे देतो आलोय आणि यापुढेही देवू असा खवचट टोला त्यांनी मारला.

घोडगंगाचा वीज करार एकट्याचा होणार नाही तर राज्यातील काही कारखान्यांचाही होणार आहे. यासाठी आमचे नेते शरद पवार साहेब गेल्या वर्षभरापासून सरकारकडे पाठपुरावा करीत असून त्यांच्या प्रयत्नांना यश म्हणून हे करार होत असताना आमदार पाचर्णे हे फुकटचे श्रेय घेत आहेत. मुळात कारखान्याच्या अर्थकारणाबद्दल बोलण्याचा त्यांना अधिकारच नाही. कारण कधीकाळी ते संचालक असताना कारखान्याच्या विस्तारीकरणासह सहवीजनिर्मिती प्रकल्पाला त्यांनी विरोध केला होता, असा आरोप पवार यांनी केला.

विशेष म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) मधील एका बैठकीत व्हीएसआयने विस्तारीकरण गरजेचे म्हटले असताना आपण मतदान घेण्याची मागणी करताच पाचर्णे तेथून पळून गेले. कारण विस्तारीकरणामुळे होणा-या कारखान्याच्या प्रगतीचे श्रेय मला मिळाले असते म्हणून. मुळात आता त्याच सहवीजनिर्मिती प्रकल्पामुळे तीनशे रुपयांचा तोटा होत असल्याचे मान्य करीत असल्याने ते दुटप्पी वागत असल्याचे यातून निष्पन्न होत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
दरम्यान मोदी लाटेत आमदार झाले आणि पुढे गेल्या तीन वर्षात तालुक्यात एकही संस्था त्यांना जिंकता न आल्याचे नैराश्य त्यांना लपवता येत असून त्यांनी असे आरोप करण्यापेक्षा तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुर्दशा पाहावी, असा सल्ला त्यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com