मराठा, धनगर समाजाच्या रोषाचे आमदार मुरकुटे बळी

मराठा, धनगर समाजाच्या रोषाचे आमदार मुरकुटे बळी

नेवाशात स्वातंत्र्य दिनाच्या शासकीय कार्यक्रमापासून आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना रोखण्यासाठी आंदोलन करणाऱ्या मराठा, धनगर, मुस्लीम आरक्षण कृती समितीच्या कार्येकर्त्यांना पोलीसांनी भल्या पहाटेच ताब्यात घेतले. त्यानंतर कार्यक्रमही सुरळीत पडला.

नेवासे (जि. नगर) : नेवाशात स्वातंत्र्य दिनाच्या शासकीय कार्यक्रमापासून आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना रोखण्यासाठी आंदोलन करणाऱ्या मराठा, धनगर, मुस्लीम आरक्षण कृती समितीच्या कार्येकर्त्यांना पोलीसांनी भल्या पहाटेच ताब्यात घेतले. त्यानंतर कार्यक्रमही सुरळीत पडला. मात्र आमदार मुरकुटे यांनीही आपल्यावर ही वेळच का आली ? या सकल समाजांच्या रोषास त्यांना का सामोरे जावे लागत आहे, याचाही विचार करणे गरजेचे आहे. मराठा, धनगर समाजाने स्वातंत्र्यदिनी आमदारांना दाखविलेला झटका आगामी काळात अधिक तीव्र होईल का, याबाबत अाता विरोधकांचेही लक्ष लागले आहे.  

राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी स्व. काकासाहेब शिंदे यांच्या बलिदानानंतर सकल मराठा समाजाच्यावतीने तीव्र आंदोलने झाली. मात्र इतर समाजासाठी त्यागाची परंपरा असणाऱ्या सकल मराठा समाजांच्या तरुणांनी नेवाशात मराठा, धनगर व मुस्लीम या तीनही समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलनाचा एक आगळावेगळा प्रयोग करत 'सकल मराठा, धनगर व मुस्लीम आरक्षण कृती समिती'च्या माध्यमातून आंदोलन उभे केले. या कृती समितीच्या ता. ३ ऑगस्ट पर्यंत मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या स्व. शिंदेसह इतर हुतात्म्यांना श्रद्धांजली व मराठा धडक मोर्चा, त्यानंतर ता. ५ ते १६ दरम्यान ठिय्या, साखळी उपोषण करण्यात आले.

या सर्व आंदोलना दरम्यान नेवासे तालुक्यातील सर्वच समाजासह राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्येकर्त्यांनी सहभागी होऊन उपस्थिती दर्शविली, अनेकांनी या आंदोलकांची भेटी घेवून जाहीर पाठिंबा दिला. मात्र, या सर्व आंदोलनाकडे किंवा समाजासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना श्रद्धांजली कार्येक्रमाकडे एक लोकप्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणे हे सकल मराठा समाजासह इतरांना अपेक्षित होते. मात्र, आंदोलन दरम्यान ते अनेक वेळा नेवासे शहरात असूनही त्यांनी आंदोलनाकडे फिरकलेच नाही आणि त्यातूनच त्यांना आंदोलकांनी शहरात आडवून आंदोलकांकडे पाठ का फिरवता म्हणून जाब विचारला. 

मात्र, मुरकुटेंनी ते गंभीरतेने घेण्याऐवजी गंमतीने घेतले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुरकुटेंनी नेवाशात पत्रकार परिषद घेवून आंदोलकांवर क्रांति दिनी आंदोलनाची वेळ येणार नाही, असे जाहीर केले. मात्र क्रांतिदिनी संपूर्ण राज्यासह नेवाशात मोठ्या ताकदीने आंदोलन झाले. यासर्व घटनांमधून आमदार मुरकुटेंनी सकल समाजाचा रोष ओढून घेतला आणि त्यातूनच नेवाशात आरक्षण कृती समिती व आमदार मुरकुटे संघर्ष अधिकच पेटला. 

आरक्षण आंदोलनाचा एक भाग म्हणूनच आमदार मुरकुटेंना स्वातंत्र्य दिनी झेंडावंदनाच्या शासकीय कार्यक्रमापासून रोखण्यासाठी आंदोलकांनी आंदोलनाचे हत्यार उपासले होते. मात्र सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांनी कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने मोठा पोलिस फौजफाटा घेवून ता. १५ ऑगस्ट रोजी भल्या पहाटे नेवासे येथील साखळी उपोषणस्थळावरून कृती समितीचे समन्वयक अनिल ताके, भाऊसाहेब वाघ, बालेंद्र पोतदार, युसुफ बागवान, पोपट जिरे, अभिजित मापारी यांना ताब्यात घेतले. अन्यथा मुरकुटेंसह तालुका प्रशासनाला मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागले असते.

आरक्षण कृती समितीची पुढील आंदोलने
मराठा, धनगर, मुस्लीम आरक्षण कृती समितीच्या कार्येकर्त्यांना  स्वातंत्र्य दिनाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार मुरकुटेंनी पोलिसाकरवी आपले आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत साखळी आंदोलन संपल्यानंतर लोकप्रतिनिधींना घेराओ, त्यांच्या घरासमोर ठिय्या, मुंडन तर तहसील कार्येलयावर ढोल बाजाओ, बोंबाबोंब, ठिय्या आंदोलन तर तालुक्यात गावोगावी आरक्षणाबाबत जनजागृती अशी आंदोलने करण्यात येणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com