बैलगाडा शर्यतीचे श्रेय : दोन पाटलांच्या वादात; महेश लांडगेंची "फळी फोड'
शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे बैलगाडा शर्य़तीवरील बंदी उठविण्याचे सेलिब्रेशन करण्यात त्यांनी आघाडी घेतली. ही बंदी उठविण्यावरून शिवसेना आणि राष्ठ्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांत स्पर्धा आधी असायची. हे दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करत बसले. त्याचा फायदा लांडगे यांनी उचलला.
पुणे : बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठीच्या विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केल्यानंतर या शर्यती पुन्हा सुरू करण्याचा मार्ग खुला झाला.
बैलगाडा शर्यती संदर्भातील चांगल्या निर्णयाचे स्वागत करण्यात किंवा या त्याचे श्रेय घेण्यासाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यात नेहमीच स्पर्धा असते. मात्र याविषयी अंतिम निर्णय होऊनही शिवसेना किंवा राष्ट्रवादीने त्याचे "सेलिब्रेशन' केले नाही. या दोघांच्या वादात भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनीच यात आघाडी घेत भंडारा उधळला.
बैलगाडा शर्यती सुरु व्हाव्यात म्हणून बैलगाडा मालकांनी निमगाव खंडोबाला साकडे घातले होते. त्यावेळी नंदीला चांदीचे आवरण घालू असे जाहीर केले होते. म्हणून सर्व बैलगाडा मालकांनी 30 जुलै रोजी निमगाव खंडोबा येथे सकाळी एकत्र आले. देवस्थानाला चांदीचा नंदी अर्पण केला. यावेळी मनोगत व्यक्त करताना लांडगे यांनी बैलगाडा शर्यती सुरू झाल्या हे कोणा एकाचे श्रेय नसुन बैलगाडा मालकांच्या एकीचे यश असल्याचे सांगितले. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याचा निर्णय झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने पहिली शर्यत निमगावमध्ये व्हावी, अशी मागणी यावेळी लांडगे यांच्याकडे केली. लांडगेंनीही त्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमाचे कवित्व येथेच संपत नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात बैलगाडा शर्यतीचे शौकीन मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे येथील मतदारांसाठी या शर्यतीचा मुद्दा महत्त्वाचा असतो. शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या शर्यतीसाठी न्यायालयीन लढाई सुरवातीपासून लढली. राज्य सरकारने स्वतंत्र कायदा मंजूर झाल्यानंतर ते काही काळ आजारी असल्याने त्यांना तातडीने "सेलिब्रेशन' करता आले नाही.
दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेते दिलीप वळसे पाटील यांनीही पक्षाची सत्ता असताना यासाठी प्रयत्न केले होते. मात्र राष्ट्रवादीचे सेलिब्रेशन फ्लेक्सच्या पुढे गेले नाही. त्यामुळे "फळी फोड' ही लांडगेंनी केल्याचे चित्र पुढे आले. महेश लांडगे हे भाजपकडून शिरूर लोकसभा मतदारसंघातून खासदारकीसाठी इच्छुक असल्याची चर्चा गेले काही दिवस आहे. त्यांनी त्यासाठी मोर्चेबांधणीही केली आहे. त्यामुळे त्यांनी संधीचा योग्य फायदा उठवत आपला गाडा पुढे आणून ठेवल्याचे दिसत आहे.
शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलने केली. त्या आंदोलनातील शेतकऱ्यांवरील गुन्हे रद्द करण्यासाठी आढळराव आणि लांडगे या दोघांनीही आतापसूनच प्रयत्न सुरू केले आहेत. तसे आवाहनही त्यांनी प्रसिद्ध केले आहे. त्यामुळेच हे गुन्हे रद्द करण्याच्या श्रेयावरूनही जुंपण्याची चिन्हे आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेत असताना बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली गेली आणि तिच मंडळी नंतर ही बंदी उठविण्याचे श्रेय घेत असल्याची टीका आढळराव यांनी केली होती. या प्रश्नावर राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका "डबल ढोलकी'ची असल्याची टीका त्यांनी केली होती. प्रत्यक्षात राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही श्रेय घेणे राहिले बाजूला. उलट सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून लांडगे यांनीच सर्वात आधी भंडारा उधळला.