mla mahaesh landge tells clearly to cm | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

कर्नाटक: कुमारस्वामी यांच्या शपथविधीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार

सीएम साहेब मी तुमच्या शब्दाबाहेर नाही...पण? : महेश लांडगेंनी स्पष्ट सांगून वाद टाळला

उत्तम कुटे
शुक्रवार, 9 मार्च 2018

आमदार महेश लांडगे यांच्या समर्थक नगरसेवकांनी जीव ओतून काम केले. प्रसंगी वेळोवेळी पक्षशिस्त आणि पक्षादेश गुंडाळून ठेवला. त्यामुळेच विधानसभेत लांडगे यांना विजय मिळाला. त्या समर्थकांच्या अपेक्षा पूर्ण करताना पक्षाची चौकट अडथळा ठरली, तर लांडगे यांची अस्वस्थता वाढते. तिकीट वाटप असो किंवा सत्ता मिळाल्यावर पदवाटप असो, त्यांच्या याच शैलीमुळे लांडगे यांची क्रेझ आजही कायम आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदी आपल्या समर्थकाला संधी देण्यावरून सत्ताधारी भाजपमध्ये दुफळी निर्माण झाल्याचे नुकतेच पाहावयास मिळाले.राम-लक्ष्मण जोडीत (भाजपचे शहरातील आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे)फूट पडणार का, अशी परिस्थिती होती.

नाराज महेश लांडगे यांनी महापालिकेत स्थायी अध्यक्ष निवडीच्या वेळी हजेरीही लावली नाही. आमदार जगताप यांनी एकट्यानेच स्थायी समिती निवडणूक‘हॅन्डल’केली. अत्यंत अटीतटीची होणार म्हणता म्हणता ही निवडणूक सहज सोपी झाली. कारण, आमदार लांडगे गटाने नाराजीतून बंड नव्‍हे, तर राजधर्म पालनाची भूमिका घेतली. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली निष्ठा पूरक ठरली, असे आता स्पष्ट झाले आहे.

पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार असलेल्या आमदार जगताप आणि लांडगे यांचे नेतृत्त्व निश्चितच बंडखोरीतून उदयाला आले आहे. तत्कालीन राजकीय परिस्थितीचा विचार करुन त्या त्या वेळी घेतलेला निर्णय हा दोन्ही नेत्यांनी यशस्वी करुन दाखवला आहे.  राष्ट्रवादीमध्ये सुमारे 12 वर्षे काम केल्यानंतर आमदार लांडगे यांनी बंडखोरी केली. त्यावेळी तत्कालीन स्थानिक नेतृत्त्वाने डावलल्याची भावना होती. त्याला राष्ट्रवादीतील अनेक नगरसेवकांनी खुला पाठिंबाही दर्शवला. त्यामुळेच 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष विजय मिळवता आला. अन्यथा प्रचंड मोदी लाटेत आमदार लांडगे यांचा निभाव लागणे अशक्यप्राय होते. विशेष म्हणजे, त्यावेळी राष्ट्रवादीचे कारभारी असलेल्या अजित पवार यांच्याशी आजही आमदार लांडगे यांचे मतभेद आहेत, असे दिसत नाही. पण, स्थानिक नेतृत्त्वाशी असलेले राजकीय वैमनस्य पराकोटीचे दिसते.

2009 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून तिकीट मिळण्याचे सकारात्मक संकेत असतानाही लांडगे यांनी राष्ट्रवादीशी निष्ठा ठेवली होती. पण, 2014 च्या निवडणुकीत समर्थक नगरसेवक आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षांच्या पूर्ततेसाठी लांडगे यांनी विधानसभेच्या रिंगणात अपक्ष उडी घेतली. त्याला साथ दिली ती राष्ट्रवादीसह अन्य पक्षांतील समर्थक नगरसेवकांनी. ज्यांच्या बोटाला धरून लांडगे राजकारणात आले, त्यांनी केलेल्या चूका समर्थकांच्या बाबतीत कदापि होवू द्यायच्या नाहीत, अशीच भूमिका लांडगेंनी कायम ठेवली. याला वास्तविकतेचा आधार आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुस-याच दिवशी आमदार लांडगे यांनी राज्यातील भाजप सरकारला पाठिंबा दर्शवला होता. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी चांगला घरोबा होईपर्यंत एकाही समर्थक नगरसेवकाचा पक्षप्रवेश घेतला नाही. त्याला तांत्रिक अडचणीचा आधार देण्यात आला. कारण, ज्या समर्थक नगरसेवकांना भाजपवासी करायचे,त्यांच्या राजकीय भविष्याचा भाजपमध्ये खरचं विचार होईल का, हा प्रश्न होता.

लांडगे हे भाजपला झुलवताहेत, असे वातावरण विरोधकांनी निर्माण केले. लांडगे यांनी भोसरी व्हिजन-2020 हा उपक्रम हाती घेतला. दिमाखदार सोहळ्यात समर्थक नगरसेवकांचा भाजप प्रवेश करुन घेतला. मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती आणि कार्यक्रम लक्षणीय ठरला. तत्पूर्वी, लांडगे समर्थक नगरसेवकांच्या बाबतीत कायम सावध भूमिका घेताना दिसत होते. त्यानंतर तुषार सहाणे, अजय सायकर आणि साधना तापकीर यांना अधिकृत उमेदवारी देताना लांडगे यांनी पक्षश्रेष्ठींकडे आटापिटा केला होता. आजवर लांडगे यांनी राजकीय कारकिर्द पाहता समर्थक नगरसेवकांना केंद्रबिंदू मानून निर्णय घेणारे लांडगे समर्थकांना न्याय देताना पक्षश्रेष्ठींवर उघड नाराजी व्यक्त करताना दिसतात.

लांडगे यांचे समर्थक केंद्रीत राजकारण

स्थायी समिती निवडणुकीत आपल्या समर्थकाला अध्यक्षपद मिळाले नाही म्हणून राजीनामा देणारे महापौर नितीन काळजे असोत. आपल्या नेत्या शिफारशीला डावलले म्हणून इच्छुक असूनही, सदस्यत्वाचा राजीनामा देणारे नगरसेवक राहुल जाधव असोत. दोन्ही समर्थकांची निष्ठा आमदार लांडगे यांच्यापाशी होती. दोघांचीही नाराजी निर्णयावर होती. बंडखोरी कधीच नव्‍हती. आमदार लांडगे यांनी समर्थकांची अपेक्षा पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री फडवणीस यांच्यापर्यंत नि:संकोच पोहोचवली. त्यामुळे लांडगे गटाची भूमिका म्हणजे पेल्यातील वादळ किंवा बंडखोरीची तयारी, असा उल्लेख करणे म्हणजे राजकीय उतावळेपणाचे होणार आहे. कारण, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी स्थायी समिती निवडणुकीबाबत झालेल्या बैठकीत साहेब, मी तुमच्या शब्दाबाहेर नाही.पण, माझ्या समर्थक नगरसेवकांना मी न्याय देवू शकलो नाही, तर उपयोग काय? कारण, राष्ट्रवादीतील तत्कालीन नेत्यांनी समर्थकांना सांभाळले नाही. त्यामुळेच त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मी तिच चूक करुन चालणार नाही, असे धाडसाने सांगितले. त्यामुळे लांडगे यांनी कायम समर्थक केंद्रीत राजकारण केले आणि त्यासाठी प्रसंगी पक्षश्रेष्ठींकडे उघड नाराजीही व्यक्त केल्याचे स्पष्ट होते.

मुख्यमंत्र्यांची ताकद आणि लांडगेंचा शब्द

आमदार लांडगे विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यापासून तीन ते चार वेळा मुख्यमंत्री फडणवीस यांनी भोसरीला दौरा केला. बैलगाडा शर्यत या राज्यातील शेतक-यांच्या दृष्टीने जिव्‍हाळ्याचा विषय असलेल्या मुद्यावर भाजप सरकार आणि स्वत: मुख्यमंत्र्यांनी आमदार लांडगे यांनाच ताकद दिली. शिरुरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना प्रतिस्पर्धी म्हणून चेहरा निर्माण करण्यासाठी भाजपनेच लांडगे यांना संधी दिली.कारण, आळंदी, खेड, राजगुरुनगर आणि जुन्नर येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणु.कांत लांडगे यांना प्रभारी म्हणून जबाबदारी दिली होती. आमदार लांडगे यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांना महापालिकेत कमळ फुलवण्याचा शब्द दिला होता. त्याला मूर्त स्वरुप देण्यात आले. महापालिकेत सत्ता आली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसारच पहिल्याच स्थायी समितीच्या कार्यकाळात भोसरी विधानसभा मतदार संघाअंतर्गत सुमारे 425 कोटी रुपयांची विविध विकासकामे मार्गी लावण्यात आली.

वास्तविक, स्थायीच्या तत्कालीन अध्यक्षा सीमा सावळे आणि भाजप सरचिटणीस सारंग कामतेकर यांच्याशी कायम फटकून राहणारे आमदार लांडगे यांनी प्रसंगी सावळे यांची भूमिका आणि कारभार योग्यच असल्याचे ठासून सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी निष्ठा ठेवणारे आमदार लांडगे समर्थकांना न्याय देण्यात आपण कमी पडणार नाही, याची पुरेपूर काळजी घेत होते. आपण काहीच बोललो नाही, समर्थक नगरसेवकांना काय उत्तर देणार? या चिंतेतून आमदार लांडगे यांनी उघड नाराजी व्यक्त केली. पण, त्याचबरोबर मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेला शब्दही पाळला. त्यामुळे आमदार लक्ष्मण जगताप यांना ममता गायकवाड यांना स्थायी समितीच्या अध्यक्षा बनवता आले.

 

संबंधित लेख