mla landge going fast | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

लांडगेंची "गाडी' जोरात ! जगतापांना शह ; आढळरावांना "संदेश'! 

उत्तम कुटे 
रविवार, 13 ऑगस्ट 2017

आमदार लांडगे यांना मुख्यमंत्र्यांच्या जवळ जाण्याचा फायदा मंत्रिमंडळ विस्तारात क्रीडा राज्यमंत्रीपदाच्या निमित्ताने मिळतो कां, हे काळच सांगणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातून लांडगे यांनी जगताप यांना शह तर दिलाच. त्याचवेळी भोसरीसह शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठ्या संख्येने असलेल्या बैलगाडामालक, शौकीन मतदारांचीही सहानुभूती मिळवीत 2019 च्या लोकसभेची तयारी सुरू केली. ती करताना शिरूरचे विद्यमान शिवसेना खासदार यांनाही यानिमित्त त्यांनी धोबीपछाड दिल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. 

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील पाच विकासकामांची भुमीपूजने आणि उद्‌घाटने आपल्या मतदारसंघात घेऊन भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पक्षाचे शहरातील दुसरे आमदार आणि शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांना शह दिल्याची चर्चा कालच्या (ता.12) मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर रंगली आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैलगाडीचे सारथ्य करुन त्यांच्या आणखी जवळ जाण्यातही यानिमित्त लांडगे यशस्वी झाले आहेत. 

यापूर्वी "भोसरी व्हीजन 2020'च्या जंगी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांना पिंपरी-चिंचवडमध्ये भोसरीतच लांडगे यांनी आणले होते. 
त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी लांडगे यांचे कौतुक केले होते. तर, काल दुसऱ्यांदा शहराच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम फक्त आपल्याच मतदारसंघात (भोसरी) घेण्यात लांडगे यशस्वी झाले. पिंपरी पालिकेत भाजप प्रथमच सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री प्रथमच काल पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते. त्यामुळे त्यांच्या येण्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले होते. ही संधी साधून लांडगे यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत. 

पिंपरी-चिंचवडमध्ये पिंपरी, चिंचवड आणि भोसरी असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी पिंपरीचा अपवाद वगळता इतर दोन्ही मतदारसंघात भाजपचेच म्हणजे जगताप व लांडगे हे आमदार आहेत. तर, पिंपरी राखीव मतदारसंघात शिवसेनेचे ऍड. गौतम चाबुकस्वार हे आमदार आहेत. कालच्या पाच कार्यक्रमातील दोन उद्‌घाटने भोसरी, एक उद्‌घाटन व एक भूमीपूजन चिंचवड तर तिसरे भूमीपूजन पिंपरी व भोसरी अशा दोन्ही मतदारसंघातील होते. मात्र, हे सर्व कार्यक्रम आपल्या भोसरीत घेत चिंचवडच्या जगताप यांच्यावर कुरघोडी केल्याचे बोलले जात आहे. पूर्वी हे दोघेही राष्ट्रवादीचे सरदार होते. तेथून भाजपमध्ये आल्यानंतर शहरातील 15 वर्षाची राष्ट्रवादीची राजवट घालवून त्यांनी भाजपला सत्तेत आणले. त्यामुळे शहराचे दादा असलेल्या अजित पवारांची ही जागा घेण्यावरून या दोघा आमदारांत व त्यांच्या अनुयायांत सुप्त संघर्ष सुरू आहे.त्यासाठी ते मुख्यमंत्र्यांच्या अधिकाअधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यात तूर्त लांडगेंनी बाजी मारलेली आहे. 

पक्षाच्या शहर नेतृत्वाच्या सुप्त लढाईत प्रतिस्पर्ध्याला शह देताना लांडगे यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत. भोसरीसह शिरूर लोकसभा मतदारसंघात बैलगाडा शर्यतीचे मोठे वेड आहे. लांडगे यांनी 2019 च्या लोकसभेची तयारी यापूर्वीच सुरू केली आहे. कालची संधी साधून त्यांनी मतदारसंघात मोठ्या संख्येने असलेल्या बैलगाडामालक व शौकिनांच्या मतांची बेगमीही करून ठेवली. बैलगाडा शर्यत सुरू केल्याचे लांडगे यांचे 2019 मधील संभाव्य प्रतिस्पर्धी व शिरूरचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील हे सुद्धा घेत आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांना बैलगाडीत बसवून कासरा हातात घेत बंद झालेली ही शर्यत पुन्हा सुरू केल्याचे आपणच खरे मानकरी असल्याचे लांडगे यांनी ठसविले. त्यातून आढळरावांनाही त्यांनी नेमका संदेश दिला आहे. 

संबंधित लेख