MLA Kul and Pacharne on Sugar factory | Sarkarnama

आमदार कुल यांना जमले....पाचर्णे यांना का नाही? 

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू होण्याची पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांना अाशा आहे. तब्बल सात वर्षे कारखाना बंद आहे. सत्ताधारी भाजपचे नेते कारखाना सुरू करण्याचे आश्वासन निवडणूक प्रचारात देत होते. या आश्वासनाचा त्यांना विसर तर पडला नाही ना? 

लोणी काळभोर : रासपचे आमदार असलेले पण भाजपच्या कळपात गेलेले राहुल कुल यांनी भीमा पाटस सारख कारखाना यंदा सुरू करण्यासाठी सरकारकडून मदत मिळवून पहिले पाऊल टाकले. दुसरीकडे भाजपकडून दुसऱ्यांदा आमदार झालेले बाबूराव पाचर्णे यांना यशवंत सारख कारखाना सुरू करण्यासाठी गेली तीन वर्षे सातत्याने अपयश येत आहे. 

पाचर्णे यांच्यासह सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी कितीही आश्‍वासने दिली तरी यशवंत कारखाना या हंगामात सुरू होत नाही. दिडशे कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या कर्जाचा बोजा असल्याने कारखाना चालू करण्यासाठी कोणीही उद्योजक अथवा साखर कारखानदार पुढे येत नाही. दुसरीकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार कुल यांनी मुख्यमंत्र्याकडुन 40 कोटी रुपयांच्या कर्जासाठीची थकहमी मिळवून, येत्या गळीत हंगामात कारखाना चालु करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. 

सत्तेत थेट सहभागी नसतानाही एक आमदार आपल्या साखर कारखान्यासाठी राज्य सरकारकडून चाळीस कोटी रुपयांची थकहमी मिळवितो आणि सत्ताधारी पक्षाचा आमदार मात्र केवळ आश्‍वासने देत असल्याचे चित्र आहे. 

भीमा सहकारी साखर कारखाना गेल्या वर्षी चालू झाला नव्हता. कारखान्यावर आर्थिक बोजा असल्याने तो अडचणीत आहे. कारखाना सुरू न झाल्यने सत्ताधारी भाजपच्या नेत्यांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही कारखान्याचे अध्यक्ष कुल यांना लक्ष्य केले होते.या अडचणींतून मार्ग काढण्यात कुल यशस्वी ठरले. 

दुसरीकडे आमदार पाचर्णे पूर्व हवेलीच्या दौऱ्यावर आल्यानंतर कारखाना चालू करणार असल्याचे दर वेळी सांगतात. भीमा सहकारी कारखान्याच्या स्थावर मालमत्तेची तुलना यशवंतच्या मालमत्तेशी केल्यास यशवंतचे पारडे जड आहे. 
भीमा कारखान्याची स्थावर मालमत्तेची किंमत सुमारे पन्नास कोटी रुपयो आहे. कर्ज मालमत्तेपेक्षा अधिक आहे. 
याउलट यशवंतच्या स्थावर मालमत्तेची किंमत बाजारभावाप्रमाणे पाचशे कोटी रुपयांच्यावर वर असुन, कर्ज मात्र दिडशे कोटीच्या आसपास आहे. 

"यशवंत'च्या मालकीची तब्बल 250 एकर जमीन आहे. थेऊर व परिसरात सध्या जमिनीचा बाजारभाव दोन कोटी रुपयांच्या आसपास पोचला असुन, अडीचशे एकराची किमंत पाचशे कोटीवर जाऊन पोचते. तरीही कारखाना दिडशे कोटी रुपयांच्या कर्जामुळे कारखाना मागिल सहा वर्षापासुन बंद आहे.

कारखान्यावरील आर्थिक बोजा दुर करण्याबरोबरच, कारखान्याचा गळीत हंगाम सुरु करण्यासाठी लागणारे भांडवल उभारणीसाठी कारखान्याची सव्वाशे एकर जमिनीची विक्री करण्याची परवानगी सभासदांनी दिली. तरीही जमीन खरेदी करण्यास एकही खरेदीदार पुढे आलेला नाही. 

पूर्व हवेलीत जमिनीच्या खरेदी-विक्रीचा जोर पाहता, कारखान्याच्या जमिनीला खरेदीदार न मिळणे ही बाब पचनी पडायला जड जाते. त्यामुळेच "यशवंत'चे दुखणे केव्हा बंद होणार याची हमी कोणीच देऊ शकत नाही.  

 
 

संबंधित लेख