mla kshursagar pa | Sarkarnama

शिवसेना आमदार क्षीरसागरांचा पीए खंडणीबहाद्दर ! 

सरकारनामा ब्युराे
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

कोल्हापूर : येथील शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांचे स्वीय सहायक तोडकर (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्यावर आज पाच लाखांची खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल झाला. याबाबत बेलबाग परिसरातील प्राईम हॉस्पिटलचे डॉ. कौस्तुभ वाईकर यांनी फिर्याद दिली. तोडकर याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपचारासाठी आलेल्या पैशापैकी निम्मे पैसे तसेच प्रकरण मिटविण्यासाठी पाच लाखांची मागणी केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. 

कोल्हापूर : येथील शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांचे स्वीय सहायक तोडकर (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्यावर आज पाच लाखांची खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल झाला. याबाबत बेलबाग परिसरातील प्राईम हॉस्पिटलचे डॉ. कौस्तुभ वाईकर यांनी फिर्याद दिली. तोडकर याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपचारासाठी आलेल्या पैशापैकी निम्मे पैसे तसेच प्रकरण मिटविण्यासाठी पाच लाखांची मागणी केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. 

फिर्याद अशी - रत्नागिरीतील एकजण 10 जून 2015 ला हॉस्पिटलमध्ये दवाखान्यात दाखल होता. त्या दिवशी शिवसेनेचे कार्यकर्ते हॉस्पिटलमध्ये आले. रुग्णाचे बिल भरणार नाही, ताबडतोब डिस्चार्ज पाहिजे, असे म्हणूत दंगा केला. कर्मचाऱ्यांवर दादागिरी करून बिल न भरताच रुग्णाला जबरदस्तीने घेऊन गेले. याबाबत जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानंतर मी व प्रशासक विजय हंकारे आमदार क्षीरसागर यांच्या बुधवार पेठेतील कार्यालयात गेलो. तेथे तोडकर यांनी, तुम्ही शांत बसा; अन्यथा बनावट रुग्ण पाठवून बदनामी करू. दवाखाना बंद पाडू, अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरून तक्रार केली नाही. रुग्ण सचिन ज्ञानदेव चव्हाण 13 सप्टेंबर 2016 ला आमदार क्षीरसागर यांच्या लेटरहेडवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून उपचार करा, अशी शिफारस घेऊन दाखल झाला. नियमानुसार त्याची कागदपत्रे तयारी केली. 16 सप्टेंबर 2016 ला मात्र हा रुग्ण अचानक निघून गेला. शासकीय मंजुरीप्रमाणे सप्टेंबर 2016 ला त्याचे लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून हॉस्पिटलच्या खात्यावर जमा झाले. त्या वेळी रुग्ण चव्हाण लाख रुपये द्या, अशी मागणी करू लागला; परंतु दवाखाना बिल सोडून उर्वरित रक्कम शासनाला जमा करणार असल्याचे त्याला सांगितले. त्यानंतर दोन दिवसांतच तोडकर यांनी मला फोन करून चव्हाण याला निम्मे व आम्हाला निम्मे पैसे द्या; अन्यथा तुमच्या हॉस्पिटलविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार. आमच्या भागात व्यवसाय करायचा असल्यास आम्हाला सहकार्य केले पाहिजे, अशी धमकी दिली. तरीही मी सर्व पैसे शासनाकडे परत पाठविले. त्यामुळे तोडकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे 13 ऑक्‍टोबर 2016 ला हॉस्पिटलविरोधात आमदारांच्या लेटरहेडवर तक्रार केली. त्याप्रमाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने हॉस्पिटलची चौकशी केली. चौकशीत गैरप्रकार आढळला नाही. 
दरम्यान, 2 फेब्रवारी 2017 ला तोडकर राजीव गांधी जिल्हा समन्वयक डॉ. अशोक देठे यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये आले. त्या वेळी तोडकर यांनी आमदार क्षीरसागर यांच्या नावाचे व्हिजिटिंग कार्ड देऊन आमदारांचा "पी. ए.' असल्याची ओळख सांगितली. सोबत आणलेल्या आमदारांच्या लेटरहेडवर माझ्या नावे लिहिलेल्या पत्रामध्ये राज्य शासनाच्या जीवनदायी योजनेतून व मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्राप्त झालेल्या निधीची माहिती मिळण्यासाठी लेखी पत्र दिले. त्या वेळी डॉ. अशोक देठे यांच्या समक्ष तोडकर यांनी हे सर्व प्रकरण केलेल्या तक्रारी मिटविण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली. बुधवार पेठेतील कार्यालयात येऊन आमदारांना भेटा, असा दम देऊन गेला. त्याप्रमाणे हॉस्पिटलचे हंकारे यांना आमदारांच्या कार्यालयात पाठविले. तेथे तोडकर यांनी आमच्या मतदारसंघात हॉस्पिटल चालवायचे असेल तर दोन दिवसात पैसे जमा करा, असे सांगितले. 

संबंधित लेख