mla kshirsagar on chandrakantdada | Sarkarnama

चंद्रकांतदादांना सत्तेचा माज : आमदार क्षीरसागर 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

शिवसेनेत दोन गट कायम 
डॉल्बी ला शिवसेनेचे समर्थन आहे, पण त्यासाठी दोन गट कार्यरत झाल्याचे आज दिसून आले. जिल्हा प्रमुख व आमदार यांच्यातील वाद यातून दिसून आला. जिल्हा प्रमुख पवार यांनी पत्रकार परिषदेत डॉल्बी विरोध खपवून घेणार नाही असे सांगितले, तर सायंकाळी याच मागणीसाठी आमदार क्षीरसागर यांनी मेळावा घेतला. 
 

कोल्हापूर : विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी लावण्यावरून महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील व शिवसेनेत संघर्षाची चिन्हे निर्माण झाली आहेत. चंद्रकांतदादा म्हणजे हिटलर, त्यांना सत्तेचा माज आला आहे, या भाषेत शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी समाचार घेतल्याने या दोघांतील संघर्ष अटळ आहे. 

अमार्यदित आवाजाच्या डॉल्बी सिस्टीमला पोलीसांसह जिल्हा प्रशासनाने कडाडून विरोध केला आहे. गणेश आगमन मिरवणुकीत पोलीसांच्या ठाम भुमिकेमुळे डॉल्बीशिवाय मिरवणूक निघत नाही त्या राजारामपुरी परिसरात एकही डॉल्बी वाजली नाही. पोलिसांच्या या भुमिकेला पालकमंत्री या नात्याने चंद्रकांतदादा पाटील यांनी पूर्ण पाठिंबा दिला आहे. त्याचे तीव्र पडसाद त्यानंतर शहरात उमटले. 

सोमवारी  डॉल्बीबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीतही श्री. पाटील यांनी डॉल्बी नाही म्हणजे नाही अशीच भुमिका घेतली. आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना "मी तुमचे ऐकायला आलेलो नाही, डॉल्बी लावू देणार नाही' या शब्दात खडसावले. या बैठकीत काही मंडळांनी डॉल्बी न लावण्याचा निर्णय जाहीर केला. पण डॉल्बीशिवाय मिरवणूक नाही असे समीकरणच असलेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांत मात्र अस्वस्थता आहे.

या पार्श्‍वभुमीवर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी उद्या (ता. 30) डॉल्बीच्या समर्थनार्थ मंडळाच्या कार्यकर्त्यांसह विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. याच मागणीसाठी आमदार क्षीरसागर यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीलाही मोठी गर्दी होती. या बैठकीत श्री. क्षीरसागर यांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मंडळाच्या कार्यकर्त्यांचेही ऐकून न घेणारे चंद्रकांतदादा पाटील हे हिटलर आहेत, त्यांना सत्तेचा माज आला आहे. सत्ता जाते आणि येते, प्रत्येकाची वेळ असते अशी टोलेबाजी श्री. क्षीरसागर यांनी केली. दोन टॉप व दोन बेस लावण्याची परवानगी द्या, तरीही प्रशासन आपल्या भुमिकेवर ठाम राहील्यास मिरवणूक तर रोखूच पण राज्य पातळीवरील शिवसेनेच्या नेत्यांना अनंत चतुर्थीला कोल्हापुरात आणून हिसका दाखवू असाही इशारा त्यांनी दिला. याच मागणीसाठी 3 सप्टेंबर रोजी उपोषण करण्याचाही इशारा त्यांनी दिला. 
श्री. क्षीरसागर यांच्या या आक्रमक भुमिकेमुळे शिवसेना व भाजपात विशेषतः पालकमंत्री यांच्यात संघर्ष अटळ आहे. त्यात श्री. क्षीरसागर यांनी पालकमंत्र्यांकवर बोचरी टीका केल्याचे पडसादही या उत्सवात उमटण्याची शक्‍यता आहे. प्रशासन यावर काय भुमिका घेणार यावरच हा संघर्ष किती लांबेल हे अवलंबून आहे. 

 

संबंधित लेख