MLA Kshirasagr demands investigation against Chandrakant Patil | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

चंद्रकांत पाटलांच्या संपत्तीची चौकशी करा : आमदार क्षीरसागर 

निवास चौगले
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्याही निवडणुका आल्या की लाखो रुपये वाटले जात आहेत. इतके पैसे येतात कुठून याची ईडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणीही श्री. क्षीरसागर यांनी केली. यावेळी कोल्हापूर,सांगली,सातारा जिल्ह्याचे संपर्क नेते खासदार गजानन कीर्तिकर,कोल्हापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

कोल्हापूर : राज्याच्या पातळीवर शिवसेना व भारतीय जनता पक्षात मतभेद आहेत, त्याचे पडसाद कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातही उमटत आहेत. त्याचाच प्रत्यय आज कोल्हापुरात आला. शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी थेट जिल्ह्याचे पालकमंत्री व भाजपाचे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याच संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी श्री. पाटील यांच्याकडे असलेल्या खात्यांची ईडीमार्फत चौकशी करावी असाही आग्रह धरला आहे. 

श्री. क्षीरसागर यांच्यावतीने भाऊबीजेचे औचित्य साधून आज एक हजार महिलांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात त्यांनी पालकमंत्री पाटील यांनाच आपल्या टीकेच लक्ष्य केले.

ते म्हणाले, ""मी आणि चंद्रकांत पाटील आम्ही 2009 ला एकत्र आमदार होतो. त्यानंतर आज 2014 मध्ये सुद्धा ते आणि मी एकत्र काम करत आहोत.2009 ची चंद्रकांत पाटील यांची आर्थिक परिस्थिती आणि आत्ताची त्यांची आर्थिक परिस्थिती यात जमीन अस्मानाची तफावत झाली आहे.'' 

कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्याही निवडणुका आल्या की लाखो रुपये वाटले जात आहेत. इतके पैसे येतात कुठून याची ईडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणीही श्री. क्षीरसागर यांनी केली. यावेळी कोल्हापूर,सांगली,सातारा जिल्ह्याचे संपर्क नेते खासदार गजानन कीर्तिकर,कोल्हापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

गेल्या दोन वर्षापासून क्षीरसागर विरूध्द पाटील यांच्यातील संघर्ष या ना त्या कारणाने जिल्ह्याने बघितला आहे. राज्यात शिवसेना सत्तेत असूनही सरकारवर तुटुन पडत असताना श्री. क्षीरसागर यांनीही संधी मिळेल तिथे श्री. पाटील यांच्यावर टीका करण्यास सुरूवात केली आहे. वर्षभरापुर्वी श्री. पाटील यांनी 2019 ला क्षीरसागर पुन्हा आमदार नसतील अशी टीका केली होती, त्यानंतर या दोघांतील संघर्ष उफाळूनच आला आहे. डॉल्बीविरोधात श्री. पाटील यांनी एल्गार पुकारल्यानंतर डॉल्बी समर्थनार्थ श्री. क्षीरसागर यांनी शहरात रान उठवले होते. या वादामागेही या दोघांतील तीव्र संघर्ष हेच कारण होते. आता श्री. पाटील यांच्यासह त्यांच्याकडील खात्यांची ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी करून श्री. क्षीरसागर यांनी नवा वाद निर्माण केला आहे. त्याला श्री. पाटील यांच्याकडून कोणते प्रत्युत्तर मिळणार याविषयी उत्सुकता आहे.  
 

संबंधित लेख