mla kardile ganesh festival | Sarkarnama

आमदार कर्डिले यांना आठवतो बालपणीचा गणेशोत्सव! 

मुरलीधर कराळे 
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

लहाणपणी गणेशोत्सवाची मजाच वेगळी होती. प्रत्येक गणेशोत्सव लहानपणची आठवण घेऊनच येतो, अशा शब्दांत राहुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी "सरकारनामा'शी बोलताना लहाणपणीच्या आठवणींचे गोठोडे सोडले. 

नगर : लहाणपणी गणेशोत्सवाची मजाच वेगळी होती. प्रत्येक गणेशोत्सव लहानपणची आठवण घेऊनच येतो, अशा शब्दांत राहुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी "सरकारनामा'शी बोलताना लहाणपणीच्या आठवणींचे गोठोडे सोडले. 

बुऱ्हाणनगर (ता. नगर) येथील बंगल्यात आज सायंकाळी आमदार कर्डिले यांनी पत्नी अलका, मुलगा अक्षय यांच्यासह गणपती बप्पा मोरयाच्या जयघोषात गणपतीची प्रतिष्ठापना केली. प्रत्येक वर्षी घरात अत्यल्प डेकोरेशन करून गणेश स्थापना केली जाते. गावातील मंडळांमध्ये मात्र जोरदार प्रतिष्ठापना होते. मुलगा अक्षयच्या नेतृत्त्वाखाली अनेक मंडळे विविध उपक्रम राबवितात. 

कर्डिले कुटुंबियांमध्ये पूर्वीपासून गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. वडिल भानुदास कर्डिले लहाणपणी आम्ही सर्व भावंडांना एकत्र करून गणपती आणण्यासाठी जात असत. त्यावेळी वाजंत्री नव्हते. आम्ही आपले घरातील काही भांड्याचेच ढोल करून वाजवत गणपती आणायचो. लहानपणीची मजा वेगळी असायची. गणपती उत्सवाची वाट पहायचो. अगदी महिनाभर आधीपासून तयारी असायची, अशा लहाणपणीच्या आठवणी कर्डिले यांनी सांगितल्या. 
शालेय जीवनानंतर मंडळाच्या माध्यमातून गणपती बसवायचो. रतिबाचे दूध घालताना मंडळांमध्ये कायम सक्रीय असायचो. सायंकाळच्या म्हशीच्या धारा काढून झाल्या, की लगेचच मंडळांच्या गणपतीकडे जायचो. रात्री जागरण करून गणपतींचे कार्यक्रम करायचो. गणेशोत्सवात अनेक युवक जोडले जातात. युवकांनाही नवीन काहीतरी करण्याची संधी मिळते, असे कर्डिले म्हणाले. 

गणपतीबप्पा, बळीराजाला सुखी कर. पाऊसपाणी चांगला होऊ दे. शेतकऱ्यांची सर्व विघ्ने दूर कर, अशी प्रार्थना आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी गणपतीबप्पाकडे केली. 

संबंधित लेख