mla jeeva pandu gavit criticise hardik patel | Sarkarnama

हार्दिक पटेल यांना महाराष्ट्रातील आदिवासी कोण आहेत, याचीच माहिती नाही!

संपत मोरे
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

हार्दिक पटेल यांचा महाराष्ट्राच्या सामाजिक वास्तवाचा अभ्यास कच्चा आहे.

पुणे: 'हार्दिक पटेल यांना महाराष्ट्रातील आदिवासी कोण आहेत आणि त्यांना आरक्षण का दिलंय याचा इतिहास माहिती नाही. त्यांना सामाजिक वास्तव माहिती नाही, महाराष्ट्राच्या सामाजिक वास्तवाचा अभ्यास कच्चा आहे', असं आमदार जिवा पांडू गावित यांनी म्हटलं आहे.

काल सांगली जिल्ह्यातील आरेवाडीत धनगर समाजाचा मेळावा झाला. त्याला हार्दिक पटेल आले होते.त्या मेळाव्यात पटेल यांनी 'धनगर समाजाला आदिवासी म्हणून आरक्षण द्यावे' असे म्हटले होते. 

त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आदिवासी आमदार गावित म्हणाले,"धनगर समाजाला आरक्षण मिळावे पण आदिवासी म्हणून नको. कारण धनगर समाज आदिवासी नाही. आदिवासींच्या चालीरीती आणि धनगर समाजाच्या चालीरीती वेगळ्या आहेत. आदिवासी आजही मागास अवस्थेत जगत आहेत, धनगर समाज पुढारलेला आहे. त्यांना आदिवासी म्हणून आरक्षण कसं मिळेल?"

"धनगर समाजाला आरक्षण द्यावे, त्याना सोयीसववलती  द्याव्यात पण आदिवासी म्हणून नकोत ही आमची भूमिका आहे. हार्दिक पटेल यांना आदिवासी म्हणजे कोण हेच माहिती नाही. आदिवासींच्या वास्तवाबद्दल जर त्याना माहिती असती तर त्यांनी असे विधान केले नसते.महाराष्ट्रातील सामाजिक वास्तव पटेल यांना माहिती नाही."असं आमदार गावित म्हणाले. 

संबंधित लेख