mla harshwardhan jadhav issue in maratha parishad | Sarkarnama

स्वयंघोषित छोट्या उदयनराजेंचा सामना जेव्हा खऱ्या उदयनराजेंशी होतो! 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

वेगळा मराठा पक्ष कसा शक्‍य आहे? 

उदयनराजेंनी बोलावलेली परिषद आरक्षणासाठी होती, मात्र जाधव हे स्वत:चा राजीनाम्याविषयी सांगत इतर आमदारांनी काय करावे, याचा उपदेश करत होते. तसेच स्वतंत्र मराठा पक्ष काढण्याची मागणी करत होते. त्याला अनेक समन्वयक, मुख्यत: मराठवाड्यातील कार्यकर्ते असहमत होते. फक्‍त एका जातीचा पक्ष करुन दुसऱ्या जातींना बाजूला का सारायचे, असा प्रश्‍न त्याठिकाणी चर्चेत होता. 
 

पुणे: औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. मराठा आंदोलन पेटल्यानंतर पहिला राजीनामा देणारे आमदार तेच. ते स्वत:ला "छोटे उदयनराजे' म्हणवून घेतात. काल हर्षवर्धन जाधव यांचा सामना खऱ्या अर्थाने खऱ्या उदयनराजेंशी झाला. 

मराठा आरक्षणासाठी प्रत्यक्ष आंदोलन करत असलेल्या समन्वयकांना काल पुण्यातील रेसीडन्सी क्‍लबमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षण परिषदेसाठी बोलावले होते. मुख्यत: कोणत्याही राजकीय नेत्याला या परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आले नव्हते. प्रत्येकाची नोंदणी करुनच प्रवेश देण्यात येत होता. कार्यक्रमात लहान मोठा असा भेद न करता "राऊंड टेबल' पद्धतीने बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मिनीट टू मिनीट कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. परिषद संपल्यानंतर लगेच उदयनराजे पत्रकारांशी बोलणार होते. 

परिषदेत बोलणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने संयोजन समितीवर ताण होता. त्यामुळे प्रत्येकाला नेमक्‍या शब्दांत आणि कमी वेळेत बोलण्यास सांगण्यात येत होते. पाच सहा वक्‍त्यांनी आपल्या भावना व्यक्‍त केल्यानंतर आमदार हर्षवर्धन जाधव उभे राहिले. त्यांनी भाषण द्यायला सुरवात केली. मराठा आरक्षणासाठी आपण आमदारकीचा राजनीमा दिला, मात्र इतर लोक देत नाहीत, हा मुद्दा त्यांनी 5 मिनीटे मांडला. मराठ्यांच्या राजकारणासाठी स्वतंत्र मराठा पक्ष काढण्याची मांडणी ते करु लागले. आमदार जाधव हे इतर मुद्याकडे भरकटून स्वत:चा महिमा सांगत असल्याचे पाहून चंद्रकांत पाटील यांनी त्यांना उरकते घेण्यास सांगितले. त्याचा राग हर्षवर्धन जाधव यांना आला. तुम्हा प्रत्येकाला दाबत आहात, असे जाधव पाटलांना म्हणाले. ही परिषद आरक्षण मिळवण्यासंबंधी आहे, वेळेची मर्यादा आहे, असे पाटलांनी सांगितले तरी वाद चालूच राहिला. त्यावेळी श्रीमंत कोकाटे यांनी उठून चंद्रकांत पाटील हे संयोजक असल्याने त्याप्रमाणे चालावे लागेल, असे सांगितले. त्यावर उदयनराजे काय सांगतात, याकडे उपस्थितांचे लक्ष होते. उदयनराजे हर्षवर्धन पाटलांच्या बाजूने भूमिका घेतील, असे अनेकांना वाटत होते. मात्र उदयनराजेंनी चंद्रकांत पाटील घेत असलेली भूमिका योग्य आहे, तुम्ही उरका असे सांगितले. त्यामुळे नाराज झालेले जाधव थोडावेळा बसले अन नंतर परिषद अर्धवट सोडून गेले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख