MLA Harshawardhan Sapkal stays with tribals in Diwali | Sarkarnama

आमदार सपकाळ यांची दिवाळी आदिवासी बांधवांसोबत

अरूण जैन
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

आमदार हर्षवर्धन सपकाळ गेल्या 18 वर्षांपासून दरवर्षी दिवाळीचा भौतिक झगमगाट सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करतात. 

बुलडाणा : माणूस हा केंद्रबिंदू आणि माणुसकी हा धर्म मानणारे संवेदनशील व्यक्तीमत्व म्हणजे अखिल भारतीय काॅग्रेसचे सचिव आमदार हर्षवर्धन सपकाळ. गेल्या 18 वर्षांपासून दरवर्षी ते दिवाळीचा भौतिक झगमगाट सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करतात. 

सप्टेंबर 2000 मध्ये बुलडाणा जिल्ह्यातील आदिवासी भागातील कुपोषणाचे भिषण वास्तव समोर आले. एकीकडे अन्नाची नासाडी आणि दुसरीकडे अन्नावाचून मरणासन्न अवस्थेतील आदिवासी बालके. हे पाहून श्री. सपकाळ यांनी ठरवूनच टाकले की आता यापुढे जी काही दिवाळी साजरी करायची ती या आदिवासी पाड्यांमध्ये जाऊनच.

श्री. सपकाळ त्यावेळी मातृभूमी फाऊंडेशनच्या कार्यात व्यस्त होते. हा विचार त्यांनी फाऊंडेशनच्या सहकारी वर्गाला बोलून दाखविला. त्यातूनच संकल्पना पुढे आली की केवळ भावनिक होऊन तिथे जाण्यापेक्षा आदिवासी बांधवांसाठी कपडे, मिठाई, फराळ व आवश्यक वस्तू घेऊन जायच्या. अनेक हात पुढे आले आणि संकल्पना वास्तवात आली. 

फाउंडेशनचे कार्यकर्ते दिवाळीच्या काही दिवस आधीपासूनच कामाला लागतात. समाजातून कपडे, मिठाई, फराळ गोळा करणे. त्याची वर्गवारी करणे व दिवाळीच्या एक दिवस अगोदर तिथे पोचणे. ऐन दिवाळीत सर्वांना वाटप केले जाते. आदिवासींच्या सानिध्यात श्री. सपकाळ व मातृभूमी फाउंडेशनचे सहकारी दिपावली, पाडवा व भाऊबीज असे तिनही दिवस तिथे राहतात.

गेली 18 वर्षे अखंडीतपणे हा उपक्रम सुरू आहे.  आजच्या धकाधकीच्या  हायफाय दुनियेत सर्व सोयीसुविधापासून दूर रानावनात जीवन जगणाऱ्या आदिवासींच्या जीवनात प्रकाशाची एक पणती लावण्याचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे.

संबंधित लेख