mla bodygaurd death | Sarkarnama

भाजप आमदाराच्या अंगरक्षकाची आत्महत्या 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 23 जून 2017

आरमोरीचे भाजप आमदार कृष्णा गजबे यांच्या अंगरक्षकाने वडसा देसाईगंज येथील जनसंपर्क कार्यालयात सर्विस पिस्तूलमधून गोळी झाडून आत्महत्या केली. 

नागपूर : आरमोरीचे भाजप आमदार कृष्णा गजबे यांच्या अंगरक्षकाने वडसा देसाईगंज येथील जनसंपर्क कार्यालयात सर्विस पिस्तूलमधून गोळी झाडून आत्महत्या केली. 

भास्कर चौके हा अंगरक्षक आमदार गजबे यांच्या गावातीलच आहे. गेल्या दोन वर्षांपासून आमदार गजबे यांचा अंगरक्षक म्हणून तैनात आहे. तो सध्या देसाईगंज येथेच राहतो. देसाईगंज येथे आमदार गजबे यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. शुक्रवार सकाळी 6 वाजता दुचाकीने भास्कर चौके जनसंपर्क कार्यालयात आले. त्यावेळी जनसंपर्क कार्यालय बंद होते. या कार्यालयासमोरच चौके यांनी सर्विस पिस्तूलने डोक्‍यात गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज आल्याबरोबर समोर असलेल्या पेट्रोलपंपवरील कर्मचारी धावत आले. त्यांनी आमदार गजबे यांना माहिती दिली. जखमी अंगरक्षकाला देसाईगंज येथील रुग्णालयात दाखल केले. अंगरक्षकाची स्थिती पाहून डॉक्‍टरांनी गडचिरोली येथे नेण्यास सांगितले. आमदार गजबे घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. गडचिरोलीला नेल्यानंतर डॉक्‍टरांनी अंगरक्षकाला मृत घोषित केले. अंगरक्षकाच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. घरगुती वादातून त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी वडसा देसाईगंज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. 

संबंधित लेख