`सर सलामत तो पगडी पचास' : आमदार तापकीरांचा फिटनेस फंडा 

खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर हे ग्रामीण पठडतील नेते आहेत. सतत संपर्क, दूरवर पसरलेला मतदारसंघ, गावकी आणि शहरी असे संमिश्र मतदार यामुळे शारीरिक तंदुरुस्तीसह मनही प्रफुल्लीत सतत ठेवावे लागते. राजकारण तर निरंतर चालूच असते. त्यामुळे `सर सलामत तो पगडी पचास` या उक्तीनुसार तब्येतीकडे भीमरावअण्णा सजगतेने लक्ष देतात. त्यांचा फिटनेस फंडा त्यांच्याच शब्दांत
`सर सलामत तो पगडी पचास' : आमदार तापकीरांचा फिटनेस फंडा 

योगासने-प्राणायाम व पायी चालण्याला माझ्या दृष्टीने सर्वात महत्व आहे. रोजच्या जीवनात व्यायामाला मी फार महत्व देतो. एकवेळ जेवायला मिळाले नाही तरी चालेल. मात्र व्यायाम एकही दिवस बुडवत नाही. एकुणच काय तर "सर सलामत तो पगडी पचास' या म्हण माझ्यासाठी महत्वाची असून त्यासाठी व्यायामाला प्राधान्य असतो. 

रोज सकाळी सहा वाजता माझा दिवस सुरू होतो. सहा वाजता उठल्यानंतर साडेसहा ते आठ या वेळात व्यायाम करतो. यामध्ये प्रामुख्याने योगासने व प्राणायम तसेच पायी फिरण्यावर भर असतो. पुण्यात असतो तेव्हा दर शनिवार-रविवारी तळजाईला फिरायला जातो. निसर्गाच्या सान्निध्यात जाणे हा खरं तर माझा सर्वात आवडता छंद आहे. व्यायामावरून आल्यानंतर तयार झाल्यानंतर नऊ वाजता जेवण करून मी कार्यालयात किंवा कार्यक्रमाला बाहेर पडतो. सकाळच्या जेवणात अंडी, पालेभाज्या, कडधान्ये, चिकन आणि दूध यांचा समावेश असतो.

आहाराच्या बाबतीत माझी पत्नी सुवर्णा फार आग्रही असते. सकाळी कितीही उशीर झाला असला तरी जेवल्याशिवाय मला बाहेर पडू देत नाही. जेवणाशिवाय दिवसभर कार्यकर्त्यांच्या बैठका, जाहीर सभा, कार्यक्रम, पक्षाच्या बैठका, लग्न समारंभ यामध्ये दिवस जातो. दुपारी घरी जाणे शक्‍य नसेल तर दुपारचे जेवण कार्यकर्त्याच्या घरीच घेतो. खाण्यात अमूकच हवे, असा काही नियम नसतो. शाकाहारी, मांसाहारी जे मिळेत ते खातो. मात्र ज्वारीची भाकरी व भाजी एवढे मिळाले तरी मी समाधानी असतो.

रात्रीचे जेवण अगदी साधे असतो. ज्वारीची भाकरी व दूध खातो. रात्री झोपताना पुन्हा एक ग्लास दूध घेतो. शक्‍यतो रात्री साडेअकरा ते बारा या दरम्यान झोपण्याचा प्रयत्न असतो. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता उठायचे असते. व्यायामातून दिवसभर काम करायला नुसती उर्जा मिळत नाही तर मला एक प्रकारचे समाधान मिळते. राजकारण हे निरंतरपणे चालणारे असते. त्यात धावपळ ही नेहमीचीच असते. त्याला पर्याय नाही. मात्र या धकाधकीतही प्रत्येकाने आपले आरोग्य जपले पाहिजे. आपला "फिटनेस' असेल तर अधिक उर्जेने आपण काम करू शकतो. त्यामुळे राजकारणात सक्रिय असलेल्या प्रत्येकाने स्वत:च्या व्यायाम व आहाराकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com