MLA Bhegade may include in ministry | Sarkarnama

आमदार बाळा भेगडे यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळण्याची चिन्हे! 

उमेश घोंगडे
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

आगामी मंत्रीमंडळ विस्तारात पक्षातील नव्या आणि तरूण चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच स्पष्ट केले होते. त्यामुळे भेगडे यांचे नाव चर्चेत तरी आघाडीवर आहे. अर्थात चर्चा नेहमीच होत असतात, ती प्रत्यक्षात केव्हा येणार, याची भेगडे यांनाही प्रतिक्षा आहे.  

पुणे : राज्य मंत्रीमंडळाच्या विस्तारात भारतीय जनता पक्षाच्यावतीने जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला संधी देण्याचे पक्षाचे धोरण आहे. यानुसार मावळचे आमदार बाळा भेगडे यांना राज्यमंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार दिवाळीपूर्वी होणार की दिवाळीनंतर याबाबत मात्र निश्‍चितपणे कोणीही सांगत नाही. त्यामुळे भेगडे यांची "दिवाळी' ही दिवाळीनंतर होणार की त्यापूर्वीच याची उत्सुकता आहे. 

मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चा अनेकदा रंगल्या. भेगडे यांचे संभाव्य मंत्री म्हणून माध्यमांना त्यांचे फोटोही प्रसिद्ध केले. प्रत्यक्षात काही झाले नाही. मात्र या वेळी विस्तार नक्की होणार, असे या सूत्रांनी सांगितले. पिंपरी-चिंचवडमधून लक्ष्मण जगताप आणि पुणे जिल्ह्यातून बाळा भेगडे यांचे नाव सर्वांत चर्चेत आहे. मात्र काही बाबी भेगडे यांच्या पथ्यावर पडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे त्यांचे पारडे जड असल्याचे सांगण्यात आले. 

जिल्ह्यात मावळ मतदारसंघाने भाजपला सुरवातीपासून साथ दिली आहे. जिल्ह्यात हा एकमेव मतदारसंघ असा आहे की येथे भाजपचा उमेदवार अपवाद वगळता निवडून आला आहे. जनसंघाच्या काळात रामभाऊ म्हाळगी मावळमधून निवडून आले होते. त्यानंतर कृष्णराव भेगडे, रूपलेखा ढोरे, दिगंबर भेगडे, आणि त्यानंतर बाळा भेगडे सलग दोन वेळा निवडून आले आहेत. त्यामुळे या विस्तारात मावळ मतदारसंघाला संधी देण्याची पक्षाची योजना आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडील मंत्रीपदाचा व्याप तसेच पुणे व पिंपंरी-चिंचवडमधील जबाबदारी पाहता जिल्ह्यासाठी राज्यमंत्रीपदाबरोबरच जिल्ह्याची स्वतंत्र जबाबदारी देण्याची शक्‍यता आहे. यापूर्वी मावळचे आमदार मदन बाफना हे कॉंग्रेस सत्तेवर असताना काही काळासाठी महसूल राज्यमंत्री होते. 

आमदार भेगडे यांच्याकडे सहा महिन्यांपूर्वी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यादेखील ते जवळचे सहकारी आहेत. भारतीय जनता युवा मोर्चा तसेच पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीतही त्यांनी एकत्र काम केले आहे. आगामी मंत्रीमंडळ विस्तारात पक्षातील नव्या आणि तरूण चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच स्पष्ट केले होते. त्यामुळे भेगडे यांचे नाव चर्चेत तरी आघाडीवर आहे. अर्थात चर्चा नेहमीच होत असतात, ती प्रत्यक्षात केव्हा येणार, याची भेगडे यांनाही प्रतिक्षा आहे.  

 
 

संबंधित लेख