mla bhaskar jadhav about ganehs festival | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

कोल्हापुरमधील हॉटेलची पायरी नजरेत आली नाही, त्यामुळे टाचेच्यावरची शीर तुटली ! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

आपल्या गणपतीचे दर्शन घेऊ शकणार नाही.

रत्नागिरी : गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे ते यावर्षी गणेशोत्सवात मतदारसंघातील ठिकठिकाणच्या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी फिरू शकणार नाहीत. मुंबईतील चाकरमानी, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व आपल्या हितचिंतकांना त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून शुभेच्छा पाठविल्या आहेत. 

शुभेच्छा पत्रात जाधव यांनी म्हटले आहे की, आपल्यापैकी खूप जणांच्या घरी जाऊन मी गणपतींचे दर्शन घेतो तर सार्वजनिक मंडळांनादेखील भेट देत असतो. यानिमित्ताने स्थानिक आणि मोठ्या संख्येने आलेल्या मुंबईकर मंडळींची भेट होत असते. आपण केलेल्या मागणीनुसार झालेल्या कामांची माहिती मी स्वतः येऊन आपल्याला देत असतो आणि त्याचवेळी आपल्या गावातील, वाडीतील नवे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्याचा मी कसोशीने प्रयत्न करीत असतो. हे मी अनेक वर्षांपासून करीत आलो आहे आणि त्याचा अनुभव आपल्या सर्वांना आहे. परंतु, दरवर्षीप्रमाणे यावर्षी गणपतीमध्ये मी आपल्या गावात, वाडीत येऊ शकणार नाही, आपल्या गणपतीचे दर्शन घेऊ शकणार नाही. याचे कारण, माझ्या पायावर झालेली शस्त्रक्रिया...गेल्या महिन्यात राज्यभर मराठा समाजाचे आंदोलन सुरू होते. त्यावेळी कोल्हापूर येथील आंदोलनात मी सहभागी व्हावे असा तेथील आंदोलनकर्त्यांचा फार आग्रह होता. म्हणून मी तिथे गेलो होतो. आंदोलन झाल्यानंतर मी ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो तेथून घरी चिपळूणला येण्यासाठी निघालो असताना हॉटेलच्या हॉलमध्ये असलेली एकमेव पायरी माझ्या नजरेत आली नाही. हॉल सरळ आहे असे समजून मी चालत होतो आणि त्या पायरीवरून मी पडलो. त्यात माझ्या डाव्या पायाच्या टाचेच्या वरची शीर तुटली. त्यानंतर कोल्हापूरमध्येच पायावर शस्त्रक्रिया झाली. या घटनेला आता महिना होत आला. डॉक्‍टरांनी आणखी काही दिवस काळजी घेऊन आराम करण्याचा सल्ला दिला आहे. 
याच कारणास्तव या गणेशोत्सवामध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, असे जाधव यांनी म्हटले आहे. 

संबंधित लेख