'जाएंट किलर' आमदार भारत भालकेंची घालमेल; सहा महिन्यांत आपला पक्ष कळेल ! 

कोणत्याही पक्षात गेले तरीही राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याशी असलेली जवळीक... निवडून येण्यासाठी खासदार राजू शेट्टींची मदत घेऊन निकाल लागल्यावर तत्कालिन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासोबतची घसट... विजयसिंह मोहिते-पाटलांचा पराभव करून देखील नंतरच्या काळात त्यांच्याशीच राजकीय दोस्ताना... आता कॉंग्रेसला बाय बाय करायच्या तयारीत असल्याने नाना सांगा कुणाचे? हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.
'जाएंट किलर' आमदार भारत भालकेंची घालमेल; सहा महिन्यांत आपला पक्ष कळेल ! 

सोलापूर : पंढरपूर तालुक्‍याच्या राजकारणात वादळापूर्वीची शांतता जाणवत आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत माढ्याचा गड लढण्यास गेलेल्या कल्याणराव काळे यांनी आता पंढरपूर-मंगळवेढ्यात निवडणुकीच्या दृष्टीने पाय रोवण्यास सुरवात केली आहे. पक्षातील वरिष्ठांकडूनही त्यांना सहकार्याचा "हात' मिळत आहे. 

आज आपण कॉंग्रेसच्या मेळाव्यात दिसत असलो तरी आगामी सहा महिन्यात आपला पक्ष कोणता असेल ते कळेल असा राजकिय बॉम्ब टाकल्याने आमदार भारत भालके यांच्यातील राजकीय चुळबूळ जगजाहीर झाली. त्यांच्या सूचक वक्तव्यामुळे जिल्हाभरात चर्चेला उधाण आले आहे. याचे राजकीय क्षेत्रात वेगवेगळे संदर्भ लावण्याचे काम सुरू झाले आहे. श्री. भालके यांनी 2004 मध्ये पंढरपूरमधून शिवसेनेकडून, 2009 मध्ये नव्याने पुर्नरचित पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातून रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून तर 2014 मध्ये कॉंग्रेसकडून निवडणूक लढविली. पहिल्या निवडणुकीत पराभव पचविला. दुसऱ्यावेळी तत्कालिन मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचा पराभव केल्याने राज्यभरात त्यांची प्रतिमा "जाएंट किलर'ची ठरली. त्यानंतर त्यांनी कॉंग्रेसची पाठराखण केली. मंगळवेढा भागातील 35 गावांच्या पाणी प्रश्‍नावरून आमदार भालके यांनी रणकंदन उठविले.

सहकार शिरोमणी वसंतदादा काळे कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी रविवारी आयोजित केलेल्या कॉंग्रेस पक्षाच्या मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना आ. भालके यांनी सहा महिन्यात आपण कोणत्या पक्षात असू ते कळेल, असे सूचक वक्तव्य केले. बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी आजपर्यंत सहा निवडणुका लढविल्या. प्रत्येक निवडणूक वेगवेगळ्या पक्षाच्या, चिन्हाच्या माध्यमातून लढविली. त्यांच्या पायवाटेवरून आमदार भालके यांची वाटचाल होईल का अशीच शंका या निमित्ताने व्यक्त होऊ लागली आहे.मंगळवेढा आणि पंढरपूर तालुका कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या वागणुकीमुळे आमदार भालके उद्विग्न होऊ लागले आहेत. श्री. काळे यांचे माढा मतदारसंघात गणित काही शिजत नसल्याने त्यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाकडे मोर्चा वळविला आहे. आ. भालके यांच्या बदलत्या भूमिकेमुळे कॉंग्रेसच्या वरिष्ठांनीही श्री. काळे यांना मदतीचा "हात' देण्यास सुरवात केली आहे.

खर्डी (ता. पंढरपूर) येथील सीताराम महाराज साखर कारखाना, पंढरपुरातील नेहमीची उठबस, पै पाहुण्यांना मदत या माध्यमातून श्री. काळे यांचा संपर्क आहेच.सहकार तथा पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या सहकार्याविना विठ्ठल कारखाना अडचणीतून बाहेर पडणार नव्हता. त्यातच मंत्री देशमुख यांच्या बेरजेच्या तसेच पक्षांतर्गत विरोधकांवर शरसंधान करण्याच्या राजकारणाचाही काही परिपाक असण्याच्या शक्‍यतेला हातभार लागत आहे. भाजपचे सहयोगी सदस्य आमदार प्रशांत परिचारक यांनी आजपर्यंत भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. मात्र ते पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची जवळीकता साधून आहेत. पालकमंत्री आणि सहकारमंत्र्यांचे विळ्या भोपळ्याचे सख्य सर्वश्रृत आहेच. त्यामुळेच सहकारमंत्री देशमुखांना आमदार भालके यांनी जवळ करणे क्रमप्राप्त ठरु लागले आहे, अशा वेगवेगळ्या राजकीय बाबींची किनार आमदार भालके यांच्या वक्तव्यासंदर्भात होऊ लागली आहे.

आपल्या भूमिकेबाबतच्या वक्तव्यासंदर्भात आमदार भालके यांनी चेष्टेत म्हटल्याचे सांगत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. परंतु वृत्तपत्रातील बातमीचा कसलाही लेखी खुलासा केला नाही. सोलापुरात नुकत्याच झालेल्या सोलापूर सोशल फाऊंडेशनच्या कार्यक्रमात सहकार मंत्री देशमुख यांची विशेष भेट घेताना आपण सरकारातील मंत्र्यांना भेटायला आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com