MLA Anil Gote Opposes Girish Mahajan's Leadership | Sarkarnama

गिरीश महाजनांचे नेतृत्व अनिल गोटेंना अमान्य : महापालिका निवडणुकीपूर्वीच वाद

निखिल सूर्यवंशी  
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

आमदार गोटे आणि संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांच्यात वितुष्ट असल्याचे सर्वश्रुत आहे. त्यांच्यात महापालिका निवडणुकीतील नेतृत्वावरून कलह सुरूच होता. या डोकेदुखीवर रामबाण इलाज म्हणून राज्यातील पक्षश्रेष्ठींनी मंत्री महाजन यांची निवडणुकीचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली. त्यांच्याकडे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीची सूत्रे सोपविली. मात्र, महापालिकेबाबत पक्षाचा हा निर्णय आमदार गोटे यांच्या पचनी पडलेला नाही.

धुळे : डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीपूर्वीच भाजपमध्ये नेतृत्वावरून कलह सुरू झाला आहे. या निवडणुकीची सूत्रे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यास आव्हान देत भाजपचे शहरातील आमदार अनिल गोटे यांनी पक्षांतर्गत खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे मंत्री विरुद्ध आमदार, असा अनोखा सामना राजकीय पटलावर पाहायला मिळतो आहे.

आमदार गोटे आणि संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांच्यात वितुष्ट असल्याचे सर्वश्रुत आहे. त्यांच्यात महापालिका निवडणुकीतील नेतृत्वावरून कलह सुरूच होता. या डोकेदुखीवर रामबाण इलाज म्हणून राज्यातील पक्षश्रेष्ठींनी मंत्री महाजन यांची निवडणुकीचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली. त्यांच्याकडे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीची सूत्रे सोपविली. मात्र, महापालिकेबाबत पक्षाचा हा निर्णय आमदार गोटे यांच्या पचनी पडलेला नाही. त्यांनी मंत्री महाजन यांना उद्देश बाहेरचा माणूस चालणार नाही, ते माझ्यासह धुळेकर खपवून घेणार नाहीत, असे विधान आमदार गोटे यांनी कल्याण भवनातील पक्षीय मेळाव्यात केले. 

कार्यकर्त्यांचे सॅंडविच
महापालिका निवडणूक होण्यापूर्वीच गृहकलहामुळे बेजार झाला आहे. निवडणुकीच्या नेतृत्वावरून प्रति मुख्यमंत्री विरुद्ध आमदार, असा सामना रंगण्यास सुरवात झाली आहे. यात कार्यकर्त्यांचे सॅंडविच होत आहे. महापालिकेत सत्ता परिवर्तन घडवायचे असेल तर भाजपच्या पक्षश्रेष्ठींना गृहकलह थोपवावा लागेल. अन्यथा, त्याचे परिणाम ज्योतिषाला सांगण्याची गरज उरणार नाही, असे कार्यकर्ते उघड बोलत आहेत. आमदार गोटे यांनी राज्यात प्रति मुख्यमंत्री समजले जाणारे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास विश्‍वासू गोटातील मंत्री महाजन यांच्यावरच टीकेची झोड उठविल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. महापालिका क्षेत्रात भाजपचा आमदार असतानाही अतिक्रमण करत, विश्‍वासात न घेता मंत्री महाजन यांच्याकडे निवडणुकीची धुरा सोपविण्यात आल्याने आमदार गोटे दुखावले असल्याचे मेळाव्यातील त्यांच्या भूमिकेवरून दिसून येते. 

आयात उमेदवारांना विरोध
महापालिकेची निवडणूक माझ्या पद्‌धतीने लढवेल. पक्षात इच्छुक उमेदवार आयात केले जात असतील तर फुलाचा (कमळ) काय विचार करायचा तो नंतर, निवडणूक कशी लढवायची ते मी ठरवेल, असे सांगून वेगळी चूल मांडण्याचा पर्यायही हाती असल्याचे सूचक उद्‌गार काढले आहेत. त्यावरून पक्षश्रेष्ठींना मंत्री महाजन, संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे, शहराध्यक्ष अनुप अग्रवाल आणि आमदार गोटे यांच्यात एक तर समेट घडवावी लागेल, जागा वाटपाचा "फॉर्म्युला' ठरवावा लागेल, अन्यथा आमदार गोटे हे लोकसंग्राम संघटनेच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जातील, असा होरा कार्यकर्ते व्यक्त करताना दिसतात. 

पक्षश्रेष्ठींना साकडे
नेतृत्वावरून मंत्री आणि आमदारांमधील वाढता मतभेद पाहता दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ, असे होऊ नये म्हणून पक्षाला स्थानिक पातळीवरील गृहकलह मिटण्यासाठी लवकरात लवकर योग्य ती भूमिका घ्यावी लागेल. महापालिका क्षेत्रात पक्षापुढे निर्माण झालेला पेचप्रसंग सोडवावा लागेल. राज्यात झिरो टू हिरो झालेला आपला पक्ष भाजप, ठिकठिकाणच्या निवडणुका जिंकून सुरू असलेली घौडदौड येथील महापालिका निवडणुकीत कायम ठेवायची असेल तर मंत्री आणि आमदारांनी सबुरी ठेवून योग्य तो तोडगा काढावा, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना आहे. 
 

संबंधित लेख