MLA Anil Gote to fight Mayor's election | Sarkarnama

धुळे : 'आमदार' अनिल गोटे लढविणार 'महापौर' पदाची निवडणूक !

निखिल सूर्यवंशी 
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

आमदारकीचा द्यावा लागेल राजीनामा.

महापालिका कायदा कलम 10 (1) (ज) अन्वये कुठल्याही आमदार किंवा खासदाराला महापालिका निवडणूक लढविता येत नाही. त्याला निवडणूक लढवायची असेल तर प्रथम आमदारकी किंवा खासदारकीचा राजीनामा द्यावा लागतो. गोटे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला तर ते महापालिका निवडणुकीसाठी पात्र ठरू शकतात, असे अनुभवी प्रशासकीय अधिकाऱ्याने सांगितले. तसे झाल्यास गोटे हे प्रभाग दोन किंवा नऊमधून उमेदवारी करण्याची शक्‍यता असेल. 

धुळे :  धुळे शहराचा पुढचा 'महापौर' आमदार अनिल गोटे, अशी स्वतःच्याच नावाची घोषणा करत आमदार गोटे यांनी आपल्या राजकीय जीवनातील वेगळी खेळी खेळली. त्यांच्या या घोषणेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपचे आमदार गोटे यांनी आपल्याच पक्षातील नेते, पदाधिकाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेऊन निवडणुकीची तयारी सुरू केली होती. त्यांच्या या विरोधी भूमिकेचे पडसाद भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेतही पाहायला मिळाले. या पार्श्‍वभूमीवर आमदार गोटे यांच्या रविवारी रात्री झालेल्या सभेकडे सर्वांचेच लक्ष होते. 

येथील साक्री रोडवरील शिवतीर्थालगत सायंकाळी सातला भाजपच्याच बॅनरखाली त्यांनी सभा घेतला. माजी नगराध्यक्षा हेमा गोटे, तेजस गोटे, भीमसिंग राजपूत, सुनील नेरकर, निलम वोरा, दिलीप साळुंखे, प्रमोद मोराणकर यांच्यासह गोटे यांनी निश्‍चित केलेले काही उमेदवारही उपस्थित होते. रात्री पावणेनऊला श्री. गोटे यांनी आपले भाषण सुरू केले. या भाषणात त्यांनी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह विरोधकांवरही टीका केली. 

सभेच्या शेवटी घोषणा 
आपल्या साधारण दीड तासाच्या भाषणात श्री. गोटे यांनी विरोधकांवर टीका आणि शहर विकासावरच खर्ची घातले, त्यामुळे उपस्थितांमध्येही त्यांनी यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे महापौरपदाचा उमेदवार कोण याची उत्कंठा लागून होती. सभा संपण्याची वेळ झाली तरीही श्री. गोटे यांनी या विषयाला हात न घातल्याने हा विषय ते सोडतील असे वाटत असतानाच भाषणाच्या अगदी शेवटी पुढचा महापौर आमदार अनिल गोटे असे जाहीर केले. ही घोषणा तुम्हाला मंजूर, लॉक किया जाए...असे म्हणत त्यांनी उपस्थितांकडूनही प्रतिसाद जाणून घेतला. त्यांच्या घोषणेबरोबरच स्टेजवर तसेच गर्दीतूनही घोषणाबाजी सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

तीन गोष्टींसाठी सत्ता द्या
 
महापालिकेची सत्ता आपल्याला तीन गोष्टींसाठी द्या असे म्हणत श्री. गोटे यांनी वर्षभराच्या आत दररोज सकाळी एक तास पाणी, शहरातील 532 किलोमीटरचे रस्ते गुळगुळीत करणे व शहरातील साडेअठरा हजार झोपडपट्टीधारकांना तीन महिन्याच्या आत मालकीची घरे व सातबारा देण्याचा ठराव करेन असे आश्‍वासन दिले. 

 
माजी आमदार कदमबांडे यांचे नाव न घेता दाढीला हात लावत गोटे म्हणाले की, मला काहीजण विचारतात यांच्याशी युती करणार का? त्यांना एकच सांगतो घोडा अगर घाससे दोस्ती करेगा तो खायेगा क्‍या. मला जे हवे होते ते मिळाले, असे म्हणत या विषयावर एकप्रकारे गोटे यांनी पडदा टाकला. 

काही मिनिटे अस्वस्थ
आमदार गोटे साधारण दीड तास भाषण करत असताना शेवटी त्यांना अस्वस्थ वाटू लागले, त्यामुळे पाच मिनिटे थांबतो असे म्हणत त्यांनी भाषण थांबविले. त्यांना खुर्चीवर बसवत मंचावरील त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना हवा घातली, पाणी पाजले व साधारण तीन मिनिटांनी गोटे पुन्हा उभे राहिले व शुगर कमी झाल्याचे म्हणत पुन्हा भाषण सुरू केले व आपण स्वतःच महापौर पदाचा उमेदवार असल्याचेही जाहीर केले. 

संबंधित लेख