mla anil babar speech in dhavaleshwar | Sarkarnama

आमदार बाबर म्हणाले, मी जास्त वेळ भाषण केलं तर लोक आम्हालाच पालथे घालतील!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

खासदार संजय पाटील यांनी अनिल बाबर यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.

विटा (सांगली) : भाजपचे खासदार संजय पाटील आणि शिवसेना आमदार अनिल बाबर यांचे फारसे राजकीय सख्ख नाही. दिवंगत नेते आर आर पाटील यांची मैत्री होती. त्यामुळे बाबर आणि पाटील यांचे राजकीय सूर जुळले नसले तरी त्यांच्यात राजकीय वाद नव्हते. 

तासगाव तालुक्यातील विसापूर सर्कलचा समावेश खानापूर मतदारसंघात झाल्यावर संजय पाटील आणि अनिल बाबर यांचे राजकीय विरोधक सदाशिवराव पाटील यांची राजकीय मैत्री झाली. पाटील हे पाटलांना रसद पुरवू लागले. त्यानंतर मग अनिल बाबर आणि संजय पाटील यांचे राजकीय संबंध बिघडले. मागील दोन महिन्यापूर्वी या दोन नेत्यांनी एकमेकांच्या विरोधात टीका केली होती. काल मात्र हे दोन नेते एकत्र आले. यावेळी खासदार संजय पाटील यांनी अनिल बाबर यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. 

या दोन नेत्यांच्या एकत्र यायला कारणही तसेच होते. खानापूर तालुक्यातील  ढवळेश्वर येथील प्रदीप पाटील यांची उत्तर भारत मराठा सेवा संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचा सत्कार संभारंभप्रसंगी हे नेते एकत्र आले होते. या कार्यक्रमात खासदार पाटील यांनी "टेंभू योजनेचे पाणी प्रत्येक दुष्काळी गावात जावे यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोय. अनिल बाबर यांचाही या योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा असतो." असं  म्हणत त्यांची स्तुती केली. 

आमदार बाबर यांनी 'मी कार्यक्रमाला येताना पाहिलं. बाहेर लोक ताट आणि वाटी घेऊन बसले होते. भुकेलेले काहीजण ताटात वाटी पालथी घालत होते. मी जास्त वेळ भाषण केलं तर लोक आम्हालाच पालथे घालतील," अशी मिश्किल टिपणी केल्याने लोकांत हास्यकल्लोळ झाला. या टिपणीवर खासदार पाटील यांनीही स्मित केले. 

खासदार आणि आमदार यांना एकत्र आणण्यात ढवळेश्वरचे उपसरपंच दिलीप किर्दत यांचे नियोजन होते. ते बाबरसमर्थक असले तरी त्यांचे संजय पाटील यांच्याशीही तेवढाच जिव्हाळा आहे . त्यांनी घडवून आणलेल्या या कार्यक्रमामुळे खासदार आणि आमदार यांचे राजकीय सूर जुळतील का?हे आगामी काळात कळेल . 
 

संबंधित लेख