mla and mp war in pimapari | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

शिवसेना खासदार व भाजप आमदारांत पिंपरीत जुगलबंदी

उत्तम कुटे
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

जगताप यांच्यावतीने शहर सरचिटणीस सारंग कामतेकर यांनी प्रसिद्धीत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,""मावळ लोकसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुकांत बारणे यांचे अपयश ठळकपणे समोर आले आहे.खासदार झाल्यानंतर आपण लोकांची कामे केली आहेत, असा ऊर ते उगीचच बडवून घेत आहेत.

पिंपरी : लोकसभा निवडणुकीला पावणेदोन वर्षाचा कालावधी असताना पिंपरी-चिंचवडमधील शिवसेना, भाजपच्या संभाव्य लोकसभा उमेदवारांमध्ये आताच जुगलबंदी रंगली आहे. त्यातून या निवडणुकीला गतवेळेप्रमाणे युती होणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. शहराचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार (मावळ) श्रीरंग बारणे हे गेल्यावेळी स्वतःच्या कामाच्या जोरावर नव्हे,तर मोदी लाटेमुळे निवडून आल्याचे सांगत यावेळी त्यांनी पुन्हा शिवसेनेकडून निवडणूक लढवून दाखवावी, भाजप सोडाच, नाराज शिवसेना कार्यकर्तेच त्यांना अस्मान दाखवतील, अशी घणाघाती टीका भाजपचे शहराध्यक्ष व लोकसभेचे संभाव्य उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी आज (ता.19) केली. 

जगताप यांच्या टीकेला प्रत्युत्तर देणार असल्याचे बारणे यांनीही संकेत दिल्याने दोघांमधला हा कलगीतुरा रंगणार असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, राज्यात सत्तेत असलेल्या या दोन्ही मित्र पक्षांतील तेथील वाद आता स्थानिक पातळीवरही येऊ लागला आहे. 

शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी (मातोश्री) पक्षाचे खासदार व आमदारांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत बारणे व शिवसेना प्रवक्‍त्या आणि आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यात चकमक उडाली होती. जगताप यांनी डॉ. गोऱ्हे यांना वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देऊन त्यांना आवतण दिल्याने बारणे या बैठकीत गोऱ्हे यांच्यावर संतापले होते. 

त्या वृत्ताच्या पार्श्‍वभूमीवर जगताप यांनी आज आपले लोकसभेचे संभाव्य प्रतिस्पर्धी बारणे यांना लक्ष्य केले. मातोश्रीवरील वादाचा धागा पकडून शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी बारणे पक्षांतर्गत वाद उकरून काढत आहेत, असा वार जगताप यांनी केला. तसेच ते अपयशी खासदार ठरले असून त्यांनी पुन्हा मावळमधून निवडणूक लढवूनच दाखवावी, असे खुले आव्हान त्यांनी दिले आहे. दरम्यान, मातोश्रीवरील बैठकीत बारणे व गोऱ्हे यांच्यात कसलाही वाद झाला नसून त्यांच्यात मतभेद नसल्याचा खुलासा शिवसेनेचे पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख राहुल कलाटे यांनी आज केला आहे. 

जगताप यांच्यावतीने शहर सरचिटणीस सारंग कामतेकर यांनी प्रसिद्धीत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,""मावळ लोकसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुकांत बारणे यांचे अपयश ठळकपणे समोर आले आहे.खासदार झाल्यानंतर आपण लोकांची कामे केली आहेत, असा ऊर ते उगीचच बडवून घेत आहेत. तसे असते, तर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले असते. त्यांनी शिवसैनिकांना बळ देण्याऐवजी त्यांचे खच्चीकरणाचे काम केले आहे. ते ज्या पक्षात जातात तो पक्ष राजकारणात बुडतो, हा इतिहास आहे. ते पूर्वी कॉंग्रेसमध्ये होते. हा पक्ष आता शहरात नावालाच शिल्लक आहे. त्यांच्यामुळे शिवसेनेचीही वाटचाल कॉंग्रेसच्या मार्गावर आहे''. 

संबंधित लेख