राज ठाकरेंचे राजकारण गलिच्छ : अबू आझमी
राम मंदिराचा मुद्दा शिवसेनेला आताच का दिसला?
नगर : उत्तर भारतातील लोक तेथील विकास होत नसल्याने महाराष्ट्रात येत आहेत. महाराष्ट्रातील लोकही विदेशात, आखाती देशांत जातात. उत्तर भारतातील विकास नाही, म्हणून महाराष्ट्रात येतात, त्यात चुकीचे काय. मात्र त्या लोकांना मारहाण करण्याचे राज ठाकरे यांचे राजकारण गलिच्छ आहे, अशी टीका समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी पत्रकार परिषदेत केली.
आझमी म्हणाले, "मंदिर, मशीद आणि शहरांची नावे बदलणे हे मुद्दे घेवून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम भाजप व शिवसेना करीत आहे. या राजकारणात सर्वसामान्य जनता मात्र होरपळून जात आहे. राम मंदिराचा मुद्दा शिवसेनेला आताच का दिसला. देशात मोदी "अच्छे दिन' आल्याचे सांगत आहेत. पाकिस्तान, अमेरिका, चीन यांच्या गोष्टी करीत आहेत; पण मोदी सर्व आघाड्यांवर अयशस्वी आहेत. त्यांचे स्वच्छता अभियान कागदोपत्री आहे. प्रत्यक्षात देशात अस्वच्छता आहे. विकास करता आला नाही म्हणून राममंदिराचे राजकारण केले जात आहे. देश जातिधर्मांत विभागण्यासाठी एमआयएमला भाषणांची स्क्रिप्ट राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तयार करून देत आहे,'' असा आरोप आझमी यांनी पंतप्रधांनांवर केला.