Misusing name of Raosaheb Danve | Sarkarnama

दानवेंच्या नावाने  गंडवणारा बनावट नोटा प्रकरणी होता अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

2006-07 मध्ये भोकरदन शहरात बनावट पाचशेच्या नोटांचे रॅकेट उघड झाले होते. यात बोरसेचा समावेश असल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले होते. भोकरदन येथे उघडकीस आलेल्या बनावट पाचशे रुपयांच्या नोटांच्या  रॅकेटमध्ये त्याचे नाव सूत्रधार म्हणून पोलीस रेकॉर्डला  होते . 

औरंगाबाद : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी जवळीक असल्याचे सांगत नोकरी, बढती, कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवून भल्याभल्याना गंडविणारा  गणेश बोरसे बनावट नोटांच्या प्रकरणात मुख्य आरोपी होता अशी माहिती समोर आली आहे . 

गणेश बोरसे याने आधी तीन वेळा फसवणुकीच्याच मोठ्या प्रकरणात तीनवेळी जेलची वारी केलेली आहे अशी माहिती आता समोर येते आहे . 

 गणेश रावसाहेब बोरसे   46 वर्षांचा आहे . तो मूळ रा. करजगाव, ता. भोकरदन, जि. जालना येथील रहिवासी असून हल्ली  अंजली अपार्टमेंट, खडकेश्वर, औरंगाबादयेथे तो वास्तव्यास होता . 

2006-07 मध्ये भोकरदन शहरात बनावट पाचशेच्या नोटांचे रॅकेट उघड झाले होते. यात बोरसेचा समावेश असल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले होते. भोकरदन येथे उघडकीस आलेल्या बनावट पाचशे रुपयांच्या नोटांच्या  रॅकेटमध्ये त्याचे नाव सूत्रधार म्हणून पोलीस रेकॉर्डला  होते . 

गणेश बोरसे हा मूळचा भोकरदन तालुक्‍यातील करजगाव येथील रहिवासी आहे. दहा वर्षांपूर्वी त्याला औरंगाबादच्या आरे डेअरीतील बनावट दूधप्रकरणात अटक झाली होती. औरंगाबाद येथे  आरे दूध डेअरीचे नाव वापरून बनावट दुधाच्या पिशव्या विक्री प्रकरणात तो गजाआड झालेला होता . 

जामिनावर सुटल्यावर बोरसे याचे फसवणुकीचे प्रकार सुरूच होते. मारुती नावाने बनावट खत कंपनी उघडून अनेकांची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. मारुती कंपनीचे नाव वापरून त्याने भोकरदन येथे  बनावट खताचा कारखाना टाकलेला होता .   या बनावट खत निर्मिती आणि विक्री प्रकरणी देखील तो तुरुंगवासात होता . 

कंपनीचालकाला  गंडवले 

काल  उघडकीस आलेल्या नव्या प्रकरणात गणेश याने रावसाहेब दानवे यांचे नाव वापरून  पंधरापेक्षा अधिक व्यक्तींना गंडवल्याचा प्रकार समोर आला. यांत गणेश यास औरंगाबाद पोलिसांनी अटक केली आहे . ही फसवणूक कोटींमध्ये असल्याची माहिती पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी दिली .

 परभणी तालुक्‍यातील रामकृष्णनगरात राहणारे प्रमोद प्रभाकरराव वाकोडकर यांनी तक्रारीत नमूद केले, की त्यांचे परभणी येथे व्यंकटेश मंगल कार्यालय व वाकोडकर मल्टी सर्व्हिसेस आहे. वाकोडकर मल्टी सर्व्हिसेसची भविष्य निर्वाह निधीसंदर्भात औरंगाबाद येथे गतवर्षापासून सुनावणी सुरू आहे. त्यामुळे प्रमोद हे या सुनावणीसाठी औरंगाबाद शहरात येत-जात होते.

 नऊ मार्चला ते सुनावणीला शहरात आले असता दुपारी दीडच्या सुमारास बोरसे तेथे भेटला. त्याने प्रमोद यांना तुम्ही बऱ्याच दिवसांपासून कार्यालयात फेऱ्या मारत असल्याबद्दल विचारपूस केली. त्या वेळी प्रमोद यांनी कंपनीच्या भविष्य निर्वाह निधीसंदर्भातील अडचणी सांगितल्या व "तुम्ही येथे नोकरीस आहात का,' अशी गणेश बोरसेला विचारणा केली.

 त्यावर गणेशने "रावसाहेब दानवे यांच्या गावाचा' असल्याचे सांगितले. तसेच दानवे हे मंत्री असताना अशा प्रकारची बरीच कामे केल्याचे त्याने प्रमोद यांना सांगून, तुमचे सुनावणीचे काम तत्काळ करून देतो, अशी थाप मारत या कामासाठी दीड ते दोन लाख रुपयांची मागणी केली. दोघांमध्ये तडजोड होऊन कामाचे एक लाख रुपये देण्याचे ठरले. 

प्रमोद यांनी 16 एप्रिलला संशयित बोरसेला औरंगाबाद शहरातील क्रांती चौक येथे बोलावत पैसे दिले. त्यानंतर प्रमोद यांनी सुनावणीबाबत बोरसेला वारंवार विचारणा केली. पण, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रमोद यांनी क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार बोरसेविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

कंपनी चालकाला एक लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी अटकेतील गणेश बोरसे याला मुख्य न्यायदंडाधिकारी एम. ए. भोसले यांनी 25 मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

नेत्यांच्या नावाचा वापर जुनाच ​

 पैशाच्या जोरावर बोरसे राजकीय नेत्यांशी जवळीक साधत होता. भोकरदनचे तत्कालीन राष्ट्रवादीचे आमदार चंद्रकांत दानवे यांच्याशी देखील त्याची ओळख होती. या ओळखीचा गैरफायदा उचलत त्याने एमएससीबीमध्ये नोकरी लावून देतो असे
सांगत अनेकांकडून लाखो रुपये उकळले होते.

2012 मध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भोकरदन येथे आले असतांना बोरसे याने त्यांच्या स्वागताचे पोस्टर आणि वृत्तपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात जाहिराती दिल्या होत्या अशी देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी त्याच्या वावर अजित पवार,
चंद्रकांत दानवे यांच्या सोबत व्यासपीठावर होता.

दानवे मंत्री होताच भाजपमध्ये

रावसाहेब दानवे यांची केंद्रात राज्यमंत्री म्हणून निवड होताच गणेश बोरसे याने भाजपशी जवळीक साधण्यास सुरुवात केली. वर्तमान पत्रांमधून भल्या मोठ्या जाहिराती आणि शहरात पोस्टर लावून बोरसे आपले संबंध किती घनिष्ठ आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा. त्या आधारेच लोकांना अमिष दाखवून
त्यांच्याकडून पैसे उकळायचा अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकी दरम्यान मुंबईत बोरसेने अनेक अधिकाऱ्यांना मी दानवे यांचा भाऊ आहे, तुमच्या बदल्या करुन देतो असे सांगून पैसे उकळल्याचे प्रकरण समोर आले होते.

त्यानंतर पुन्हा त्याने दानवे यांचा स्वीय सहायक असल्याच्या थापा मारत कंत्राटदार, सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना गंडवल्याचा प्रकार समोर आला. नोकरी लावून
देण्यासोबतच विविध सरकारी कामे करून देण्याचे सांगत बोरसे याने अनेकांना आपल्या जाळ्यात ओढले. त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्याच्या तक्रारी औरंगाबाद पोलिसांकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
 

औरंगाबाद पोलिसांच्या जाळ्यात 

 गेल्या काही दिवसापासून  गणेश औरंगाबाद पोलिसांच्या रडारवर होता . उद्योजक फसवणूक प्रकरणाचा  छडा लावण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेला दिले होते. त्यानूसार, आर्थिक गून्हेशाखा व अन्य एका पथकाने तपास सूरू केला होता. आठ दिवस बारकाईने लक्ष ठेवून पोलीसांनी मूख्य संशयिताला ताब्यात घेतले. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सूरू असून अन्य दोघांचा शोध पोलीस घेत आहेत. गणेश बोरसे याने राज्यातील पंधराहून अधिक जणांना कोट्यावंधीचा
गंडा घातल्याचे पोलिस आयूक्त यादव यांनी सांगितले.

 

संबंधित लेख