mismanaged co operative banks will be attached to professional banks | Sarkarnama

राज्यातील अकार्यक्षम बॅंका व्यावसायिक बॅंकांशी जोडणार :मुख्यमंत्री 

सरकारनामा न्यूज ब्युरो
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

 राज्यातील अनेक जिल्हा बॅंका कर्जबाजारी झालेल्या आहेत. संबधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होउ नये यासाठी ज्या अकार्यक्षम बॅंका आहेत. अशा बॅंकाना व्यावसायिक बॅंकांशी जोडण्यात येतील आणि त्यांना समक्ष करण्यावर भर दिला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुंबई ता. 28 : राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्यात अडचणी येवू नयेत, यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी डबघाईला आलेल्या काही जिल्हा बॅंकांना व्यावसायिक बॅंकांशी जोडण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली.

सन 2017 / 18 ची राज्यस्तरीय खरीप हंगाम पुर्व आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नरिमन पॉंईट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शुक्रवारी पार पडली. यावेळी , शेती क्षेत्राचा विकास आणि शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. खरीप हंगामांचे नियोजन राज्यस्तरीय, जिल्हा आणि तालुका स्तरीय पातळीवर करण्यात यावे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

 राज्याचा नियोजनबद्ध कृषी आराखडा सहकार विभागाने तयार केला असून गेल्या वर्षी 40 हजार कोटी रुपयांनी शेती क्षेत्रातील उत्पन्न वाढले असून यावर्षीचे कृषी उत्पादन हे गेल्या बारा वर्षापेक्षा अधिक झाले आहे. तसेच यावर्षीचा कृषी विकास दर 12.50 टक्के आहे. आता पशुसंवर्धनांचा विकासदर वाढविण्याची गरज असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.

राज्यातील 30 ते 31 लाख शेतकरी हे कर्जाच्या परिघाबाहेर गेले आहेत. त्यांनाही कर्जपुरवठा झाला पाहिजे यासाठी अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीने नियोजनबद्ध आराखडा करुन प्रत्येक शेतकऱ्यांला कर्ज उपलब्ध करुन देता येईल असे नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

 राज्यातील अनेक जिल्हा बॅंका कर्जबाजारी झालेल्या आहेत. संबधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होउ नये यासाठी ज्या अकार्यक्षम बॅंका आहेत. अशा बॅंकाना व्यावसायिक बॅंकांशी जोडण्यात येतील आणि त्यांना समक्ष करण्यावर भर दिला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आपल्या भागातील शेतकऱ्यांसाठी जिल्हा, तालुका, गाव पातळीवर सुक्ष्म नियोजन करुन पीक कर्ज मेळावे आयोजित करावेत, तसेच कृषी विद्यापीठाने पीक पद्धतीचे नियोजन करुन आपल्या विभागात कोणती पिके घेतली पाहिजे यासाठी प्रयत्न करावे . श्‍वाश्‍वत पीक कसे घेता येईल याची गाव पातळीवर माहिती देवून नियोजन करण्यात यावे अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत.

राज्यात स्वयंचलित हवामान अंदाज केंद्र बसविण्यात येत आहेत त्याचाही यावर्षीही शेतकऱ्यांना फायदा होईल. उन्नत शेती, समृद्ध शेती हा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, शेतकरी गट, शेतकरी कंपन्यांची निर्मिती करुन गाव पातळीवर समुह तयार करुन त्यांना कृषी भांडवल उपलब्ध देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 

 

संबंधित लेख