Mira-Bhayandar Election result | Sarkarnama

मिरा-भाईंदरचा सत्ताधीश कोण? आज दुपारपर्यंत निकाल हाती येणार 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

मिरा भाईंदर महानगरपालिकेचा सत्ताधीश कोण, या प्रश्‍नाचे उत्तर आज दुपारपर्यंत हाती येईल आणि भाजप, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांबरोबरच बहुजन विकास आघाडी आणि मनसेच्या उमेदवारांचे भवितव्य स्पष्ट होईल. 

भाईंदर : मिरा भाईंदर महानगरपालिकेचा सत्ताधीश कोण, या प्रश्‍नाचे उत्तर आज दुपारपर्यंत हाती येईल आणि भाजप, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांबरोबरच बहुजन विकास आघाडी आणि मनसेच्या उमेदवारांचे भवितव्य स्पष्ट होईल. 

मतमोजणी 8 केंद्रांवर करण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. त्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान केंद्राजवळ वाहने नेण्यास मनाई करण्यात आली आहे.

दरम्यान, धुवाधार पावसातही मतदारराजा घराबाहेर पडल्याने मिरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी 46.93 टक्के मतदान झाले. मागील निवडणुकीपेक्षा ही टक्केवारी कमी असली, तरी पावसाचा रागरंग पाहता मतदानाची टक्केवारी लक्षणीय घसरेल, असा अंदाज होता. तो मतदारांनी फोल ठरवला. महापालिकेच्या 2012 च्या निवडणुकीत 47 टक्के मतदान झाले होते. 

महिनाभरापासून उमेदवार उत्साहात प्रचार करीत होते. मतदारांच्या भेटीगाठी घेत होते. सभांमध्ये आश्‍वासनांचा पाऊस पाडत होते. मात्र आज मतदानाच्या दिवशी पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू झाल्याने उमेदवारांच्या उत्साहावर पाणी पडले. सकाळी 11 वाजेपर्यंत अवघे 13 टक्के मतदान झाले. भारत- श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय क्रिकेट सामना आणि पाऊस यामुळे नागरिक घराबाहेर पडत नव्हते; परंतु दुपारनंतर हळूहळू चित्र बदलू लागले आणि दुपारी 4 वाजेपर्यंत 37 टक्के मतदान झाले. 24 प्रभागातील 95 जागांसाठी ही निवडणूक झाली. या निवडणुकीत 509 उमेदवारांनी नशीब अजमावले. काही तुरळक गैरप्रकार वगळता मतदानप्रक्रिया शांततेत झाली. 

यापूर्वीच्या म्हणजे 2012 च्या निवडणुकीत 47 टक्के मतदान झाले होते. या वेळची टक्केवारी 46.93 इतकी आहे. या कमी मतदानाचा लाभ शिवसेना, भाजप, कॉंग्रेस यापैकी नक्की कोणाला मिळेल, याबाबत उत्सुकता आहे. 

सर्वाधिक मतदान 
प्रभाग 24 मध्ये सर्वाधिक म्हणजे 62.69 टक्के; तर प्रभाग 22 मध्ये सर्वांत कमी म्हणजे 35.38 टक्के मतदान झाले. एक लाख 53 हजार 522 पुरुषांनी; तर एक लाख 24 हजार 950 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण दोन लाख 78 हजार 473 मतदारांनी मतदान केले. 

संबंधित लेख