Mira-Bhayandar Election all party Analysis | Sarkarnama

मीरा-भाईंदर : कमळ फुलले; धनुष्याचा स्वप्नभंग; कॉंग्रेसचा एकगठ्ठा मतांवर जोर

श्रीकांत सावंत / विजय गायकवाड
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

मिरा-भाईंदरच्या निकालाने सगळ्यांना अचंबित केले आहे. भाजप, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी आणि मनसे सारख्या पक्षांची गेल्या निवडणूकीतील स्थिती आणि आजची परिस्थिती याचा आढावा घेणारा हे 'मिरा भाईंदरच्या राजकीय पक्षांचे प्रगती पुस्तक'

मिरा-भाईंदर : निवडणुका ह्या राजकीय पक्षांच्या प्रगती किंवा आधोगती दर्शवणाऱ्या परिक्षा असून पाच वर्षातून एकदा येणाऱ्या या निवडणूकांसाठी प्रत्येक पक्षाकडून सगळ्या तऱ्हेच्या तयारी केली जाते. पक्षाच्या सबलीकरणासाठी इतर पक्षातील नेत्यांना आपल्याकडे खेचण्याबरोबरच प्रचाराच्या निरनिराळ्या तऱ्हा अवलंबल्या जातात. मिरा-भाईंदरच्या निकालाने सगळ्यांना अचंबित केले आहे. भाजप, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी आणि मनसे सारख्या पक्षांची गेल्या निवडणूकीतील स्थिती आणि आजची परिस्थिती याचा आढावा घेणारा हे 'मिरा भाईंदरच्या राजकीय पक्षांचे प्रगती पुस्तक'

आयात उमेदवारांच्या जीवावर 'भाजपचे' कमळ फुलले...
लोकसभा, विधानसभा आणि राज्यातील महापालिका निवडणूकांदरम्यान भाजप पक्षांने आयात उमेदवारांना आपलंस करण्याचा नवा फाॅम्युला विकसीत केला आहे. मिरा भाईंदरमध्ये या भाजप फाॅम्युल्यास चांगलेच यश आल्याचे दिसून येत आहे. शहरातील इतर पक्षातील मातब्बरांना पावन करून घेत त्यांच्या जीवावर सत्ता खेचून आणण्याचा भाजपचा प्रयत्न होता. त्यामुळे या निवडणूकीत आयात उमेदवारांच्या जीवावर भाजपचे कमळ फुलल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. याशिवाय मुख्यमंत्र्यांचा विकासाचा आजेंड्यास मतदारांनी मतपेट्यातून पसंती दर्शवली आहे. तर भाजपच्या उत्तर भारतीय, गुजरातींच्या बरोबरीने मराठी मतदारांनीही भाजपला मतदान केल्याचे निवडणूक निकालातून दिसून येत आहे. गेल्या निवडणूकीत जेमतेम 31 जागा असलेल्या भाजपने दुपट्ट झेप घेतली असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या ध्रुवकिशोर पाटील यांच्यासारख्या उमेदवारांमुळे भाजपला एकहाती सत्ता मिळवण्यात मोठी मदत झाली. 

मिरा भाईंदर महापालिकामध्ये भाजपसाठी प्रतिकुल काळ असतानाही 2012च्या निवडणूकीमध्ये भाजपने सगळ्यात मोठा पक्ष होण्याची कामगिरी केल्यामुळे मिरा भाईंदर भाजपचा बालेकिल्ला बनला होता. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीमध्ये येथील मतदारांनी भाजलपा साथ दिल्यामुळे महापालिकेमध्ये चांगले यश मिळण्याची अपेक्षा होती. त्यामध्ये मोठी वाढ करण्यासाठी भाजपने इतर पक्षातील दिग्गज नेत्यांना आपल्याकडे वळवण्यास सुरूवात केली. काही ठिकाणी भाजपच्या पारंपरिक निष्ठावान आणि अनेक दिवसांपासुन निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या मंडळींना दुर करून बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिली. 

भाजपची सगळ्यात मोठी टक्कर शिवसेना या पुर्वीच्या मित्र आणि राज्यात सत्तेत भागीदार असलेल्या पक्षाशी होती. त्यामुळे विकासाच्या प्रयत्नावरून या भागामध्ये मोठी रस्सी खेच सुरू होती. मेट्रो आणि शहर विकासाच्या प्रकल्पासाठी सुरू असेलल्ाय प्रयत्नाची मोठी जंत्री शिवसेनेकडून झाल्यामुळे भाजप अस्वस्थ होते. परंतु अखेरच्या टप्प्यात थेट मुख्यमंत्र्यांनी प्रचाराला उपस्थिती लावून मिरा भाईंदरच्या मतदारांना विकासाचा अजेंडा ठेऊन मतदानाचे आवाहन केले, या प्रचाराला चांगलीच पसंती मतदारांनी दिली. 

शिवसेनेचा अपेक्षाभंग...
ठाणे शहरालगत असलेले मिरा भाईंदर महापालिकेतील काही भाग ओवळा माजीवडा या मतदार संघात असून येथील शिवसेनेचे आमदार असल्यामुळे शिवसेनेला या भागात विजयाची मोठी अपेक्षा होती. निवडणूक पुर्व सर्वेक्षणावरून शिवसेना 52 जागांपर्यंत विजय मिळवेल असा दावा शिवसेना पक्षाकडून केला जात होता. इतर पक्षातील उमेदवारांना आपल्याकडे घेण्याचा फाॅम्युला शिवसेनेना आणला होता. राष्ट्रवादीचे मिरा भाईंदरचे सर्वेसर्वा अशी ओळख असलेले गिल्बर्ट मिंडोसा यांना पक्षात घेतल्यामुळे शिवसेनेने आर्धी लढाई जिंकल्याची चर्चा सुरू होती. परंतु शिवसेनेला आयात उमेदवारांचा म्हणावा तसा फायदा घेता आला नाही आणि शिवसेनेचा मोठा अपेक्षाभंग या निवडणूकीमध्ये झाला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेमुळे मिरा भाईंदरमध्ये पक्षाला चांगल्या जागा मिळतील, अशी अपेक्षा होती. परंतु ही अपेक्षा फोल ठरली आहे. गेल्या निवडणूकीमध्ये शिवसेनेला अवघ्या 14 जागा मिळाल्या होत्या. त्यामध्ये या निवडणूकीमध्ये नक्कीच वाढ झाली असून त्या 22 पर्यंत पोहचल्या आहेत. परंतु ही प्रगती बाहेरून आलेल्या काही दिग्गज उमेदवारांच्या जिवावर आहे असे म्हणावे लागेल. 

बहुजन विकास आघाडीतचे तीन उमेदवार असलेल्या नगरसेवकांना शिवसेनेने आपल्याकडे वळवले होते. आणि हे तीन्ही उमेदवार पुन्हा निवडून आले आहेत. त्यामध्ये शिवसेनेचे म्हणावे तसे श्रेय नाही. याशिवाय शिवसेनेच्या ठाणे जिल्हा नेतृत्वानेही या भागात विशेष लक्ष दिल्याचे दिसून आले नाही. शिवसेनेचा प्रचाराचा रोख हा विकासाचा होता. येथील स्थानिक भाजप आमदार हे पुर्वी नगरसेवक असल्यामुळे आमच्या प्रयत्नानेच शहरामध्ये विकासाची कामे झाली आणि त्यांचे श्रेय आत्ता भाजप घेत आहे, असा शिवसेनेचा आरोप होता. परंतु याकडे मतदारांनी काहीसे दुर्लक्ष केले. गुजराती आणि उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षात घेऊन भाजपने इथे हिंदी भाषिक भवनाचे आश्वासन दिले होते. तर गुजराती भाषेमध्ये भाषणे देऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रय़त्न केला. यामुळे काही मराठी मतदारही शिवसेनला सोडून गेल्याचे दिसून आले. या निवडणूकीमध्ये शिवसेनेची उमेदवार संख्या वाढली असली तरी अपेक्षीत यश मात्र पदरात पडू शकले नाही. 

एकगठ्ठा मतांवर 'कॉंग्रेस'ची मदार... 
मिरा भाईंदरमध्ये गुजराती आणि उत्तर भारतीय मतदारांच्या बरोबरीनेच मुस्लीम मतदारांची मोठी संख्या असून मिरा रोड भागामध्ये हे मतदार मोठ्या संख्येने आहे. एकगठ्ठा मतदान करण्याच्या या समाजाच्या मतांनी कॉंग्रेसची बुडती नौका किनाऱ्यावर लावण्याचा प्रय़त्न केला असला तरी ही कामगिरी पक्षासाठी समाधानकारक नसल्याचे दिसून येते. कॉंग्रेसचे दिग्गज नेते मुझ्झफर हुसेन यांच्या परिसरातील गड कॉंग्रेसने राखला असला तरी पुर्वी असलेले संख्याबळ भाजप लाटेमध्ये टिकवता आले नाही. गेल्या निवडणूकीमध्ये 19 नगरसेवक असलेल्या कॉंग्रेसला 10 नगरसेवक निवडून आले आहेत. राष्ट्रवादीच्या तुलनेमध्ये हे यश बरेचसे आशादायक आहे. शहरातील नयानगरसारख्या मुस्लीम प्रभागामध्ये चार पैकी चार उमेदवार निवडणून देण्यात हे मतदार यशस्वी झाले आहेत. 

देश आणि राज्यामध्ये मुस्लीम मतदार भाजप कडे जाण्यापेक्षा कॉंग्रेसला जवळ करत असून मिरा भाईंदरमधील मुस्लीम बहुल प्रभागामध्ये याची प्रचिती आली. मुझ्झफर हुसेन यांच्या परिसरामध्ये मुस्लीम मतदारांनी एकगठ्ठा मतदान करून कॉंग्रेसला यश मिळवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु दहा आकड्याच्या वर जाण्यात कॉंग्रेस अयशस्वी ठरले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा सुफडा साफ...
मिरा भाईंदर महापालिकेच्या स्थापनेपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वरचश्मा या शहरावर राहिलेला असून सलग दोन टर्म राष्ट्रवादीला पसंती देण्यात येथील मतदारांनी पुढाकार घेतला होता. 2012 च्या निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांच्यामध्ये फुट पडल्यामुळे भाजप आणि शिवसेना सत्तेवर आली होती. परंतु तरीही राष्ट्रवादीचा या भागात मोठे वर्चस्व होते. लोकसभा आणि विधानसभांमधील निवडणूक निकालानंतर भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांनी मोठी जागा व्यापल्यामुळे राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गजांनी या दोन पक्षांचा मार्ग अवलंबला. मिरा भाईंदरमधील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा गिल्बर्ट मिंडोसा हे तेथील पहिले आमदार आणि सलग दोन टर्म महापालिका त्यांच्या ताब्यात होती. परंतु जमिन गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगात गेलेल्या मिंडोसांची पक्षावरील पकड सैल झाली. त्यानंतर निवडणूकीच्या तोंडावर तुरुंगातून सुटलेल्या गिल्बर्ट यांनी शिवसेनेचा मार्ग अवलंबला. गिल्बर्ट यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीच्या सगळ्याच नगरसेवकांनी भाजप आणि शिवसेना पक्षांत प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये एकही नगरसेवक या निवडणूकीमध्ये नव्हता. नव्या चेहऱ्यांना यामुळे संधी मिळाली असली तरी त्यांना राष्ट्रवादीच्या मतदारांना आकर्षित करण्यात अपयश आले. 

बहुजन विकास आघाडी आणि मनसेच्या पदरी अपयश... 
बहुजन विकास आघाडीमध्ये वैयक्तीत करिष्म्यावर निवडून येणारे तीन नगरसेवक होते. निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर या तीनही नगरसेवकांनी शिवसेनेची वाट धरली आणि बहुजन विकास आघाडीचाही सुपडा साफ झाला होता. मनसेच्या एकुलत्या एक नगरसेवकालाही या निवडणूकीमध्ये यश मिळवता आले नसल्यामुळे त्यांच्याही पदरी अपयश आले आहे. 

संबंधित लेख