mira bhayandar | Sarkarnama

मीरा भाईंदरमध्ये भाजप आमदार मेहतांची कसोटी! 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 6 ऑगस्ट 2017

मीरा भाईंदर महापालिकेत स्वबळावर भाजपचा महापौर होणार असल्याचा विश्वास आ. नरेंद्र मेहता यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचाही बिनशर्त पाठिंबा मिळवण्यात भाजपा नेतृत्वाला यश आल्याने दलित आणि बहुजन समाजाची एकगठ्ठा मते भाजपाच्या उमेदवारांना मिळतील असे मेहता यांना वाटते आहे . 

मुंबई : मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढणाऱ्या भाजपला शिवसेनेचे मोठे आव्हान आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जातीने लक्ष देत असलेल्या या निवडणुकीची धुरा भाजपने आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर सोपविली आहे. शिवसेनेने माजी आमदार गिल्बर्ट मेंडोंसा यांच्यासारख्या तगडया नेत्याच्या हातात सूत्रे दिल्याने मेहता यांना विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. 

महापालिकेचे मतदान 20 ऑगस्टला होणार असून भाजपने उमेदवारी यादी जाहीर केली आहे. गुजराती, मारवाडी आणि हिंदी भाषिकांची मोठी लोकसंख्या असलेल्या या महानगरात एकूण 95 पैकी 38 जागांवर मराठी उमेदवार दिले आहेत. त्याबरोबरच 57 अमराठी उमेदवारांना उमेदवारी देत सर्व समाज घटकांना पुरेसे प्रतिनिधित्व देण्याचा भाजपने प्रयत्न केला आहे. मुस्लीम समाजाला 5 ठिकाणी आणि ख्रिश्‍चन समाजाला 4 जागांवर उमेदवारी देत सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. 

सध्या भाजपच्या गीता जैन महापौर आहेत. 2012 मध्ये शिवसेना आणि भाजप युती म्हणून मीरा भाईंदरची सत्ता मिळवली होती. आता 2017 च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप आमने सामने आहेत. भाजपमध्ये अंतर्गत वादाची स्थिती आहे. नरेंद्र मेहता यांच्या एकाधिकारशाही विरोधात महापौर जैन यांची नाराजी आहे. मेहता यांच्यावर भाजपने निवडणुकीची जबाबदारी सोपवली असलीतरी पक्षातील विरोधकांशी जुळवून घेत सत्ता आणण्याचे मेहता यांच्यापुढे जिकरीचे आव्हान असणार आहे. 

संबंधित लेख