शिवसेनेला धोबीपछाड देत भाजपची मीरा भाईंदरमध्ये सरशी !

बहुमताचा 48 चा आकडा गाठणे सेनेला मुश्‍कील झाले आणि धनुष्य बाणांचा वेध 22 जागा मिळविण्यापुरता मर्यादित राहिला. जैन, गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीय समाजावर आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पगडा कायम असल्याचे भाजपला मिळालेल्या यशामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
 शिवसेनेला धोबीपछाड देत भाजपची मीरा भाईंदरमध्ये सरशी !

मुंबई : मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रातील महत्वाचे शहर असलेल्या मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपने शिवसेनेसह विरोधकांना पाणी पाजत एकहाती सत्ता खेचून आणली आहे. राज्यात मांडीला मांडी लावून सत्तेत बसणाऱ्या शिवसेनेला सोमवारी मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने आणखी एक झटका दिला आहे. 

वाढत्या लोकसंख्येमुळे 1995 नंतर मुंबई शहराला लागून असलेल्या भागात गेल्या 15 ते 20 वर्षांत चार महापालिका निर्माण झाल्या, त्यामध्ये मीरा भाईंदरचा समावेश आहे. जैन, गुजराती, मारवाडी समाजाची सुमारे 30 ते 35 टक्के लोकसंख्या, त्या खालोखाल 14 टक्के उत्तर भारतीय आणि 15 ते 20 टक्के मराठी मतदारांची संख्या असलेल्या या शहरात गुजराती, मारवाडी, जैन समाज हा भाजपचा परंपरागत मतदार म्हणून ओळखला जातो. 

महापालिकेच्या निवडणुकीत यावेळीही याच समाजाने साथ दिल्याने मीरा-भाईंदर महानगरपालिकेची सत्ता कायम राखण्यात भाजपला यश मिळाले. खरे तर यावेळी भाजपसमोर अनेक आव्हाने उभी होती. स्थानिक भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या प्रभावाखाली या महापालिकेचा कारभार चालविला जात असल्याने भाजपमध्ये नाराजांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली होती. निवडणुकीच्या तोंडावर पक्षातली बंडखोरी, पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे भाजपपुढे एकहाती सत्ता मिळविण्याचे आव्हान उभे होते. सुरुवातीच्या काळात सत्तेचा मोठा दावेदार म्हणून भारतीय जनता पक्षाकडे बघितले जात होते. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात भाजपकडून 95 जागांपैकी 75 जागा जिंकण्याची भाषा केली गेली होती. 

मात्र शिवसेनेने आक्रमक आव्हान उभे केल्यानंतर बदलेल्या परिस्थितीत भाजपने भाषा बदलत 60 जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला होता. भाजपकडून या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी भाजपचे स्थानिक आमदार नरेंद्र मेहता आणि प्रभारी रवींद्र चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली होती, तरीही या निवडणुकीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बारकाईने नजर होती. 

भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेनेही जोर लावला. त्यामुळे मुख्य लढत ही भाजप आणि शिवसेना या दोन मित्रपक्षांमध्ये रंगली. या निवडणुकीत भाजप, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे, बहुजन विकास आघाडी, स्थानिक आघाडी असे विविध पक्ष उतरले असले तरी कॉंग्रेसला दहाचा आकडा गाठण्यात कसेबसे यश मिळाले तर पाच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीनंतर प्रमुख विरोधी पक्षाचे स्थान असलेल्या राष्ट्रवादीसह अन्य पक्षांना आपले खातेही खोलता आले नाही 

यंदाच्या महापालिका निवडणुकीत भाजपला सत्तेपर्यंत पोहोचू द्यायचे नाही, असा शिवसेनेने चंगच बांधला होता. यासाठी शक्‍य होईल त्या पद्धतीने भाजपला खिंडीत गाठण्याची एकही संधी शिवसेनेने सोडली नाही. एकेकाळी मीरा भाईंदरचा डॉन म्हणून ओळखला जाणारा राष्ट्रवादीचा माजी आमदार गिल्बर्ट मेंडोंसा याला शिवसेनेत घेऊन भाजपला तगडे आव्हान देण्याचा प्रयत्नही मतदारांना रुचला नसल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. 

कोट्यवधी रुपयाच्या जमीन घोटाळा प्रकरणात मेंडोंसा कारागृहात होता. त्यातच 2012 मध्ये निवडून आलेले राष्ट्रवादीचे काही नगरसेवक पक्ष सोडून गेले होते. गिल्बर्ट मेंडोंसा जामिनावर बाहेर आल्यानंतर शिवसेनेने मेंडोंसाला शिवसेनेत प्रवेश दिला. मीरा भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता विरुद्ध सर्व पक्ष असे समीकरण या निवडणुकीत निर्माण झाले होते. मेंडोंसा शिवसेनेत आल्यामुळे भाजपला रोखता येईल हे गणित चुकल्याचे सेना नेत्यांच्या आता लक्षात आले असावे. 

केवळ मराठी मतांवरच राजकारण खेळणाऱ्या शिवसेनेने महापालिकेतल्या विजयासाठी आपली भूमिका बदलून सोशल इंजिनीयिरगची कास धरली. बहुसंख्य अमराठी भाषिक असलेल्या शहरात जम बसवण्यासाठी प्रत्येक जातिधर्माला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला. मात्र फक्त दोन उत्तर भारतीय उमेदवार शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले आहेत. बाकी समाजाला आपल्याकडे वळवण्यात शिवसेनेला अपयश आले आहे. 

त्याचप्रमाणे भाजपमधील नाराज नगरसेवकांना हेरून त्यांनाही पक्षात सामील करून घेण्यासाठी सेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली नियोजन करण्यात आले होते पण त्यामुळे वर्षांनुवर्षे पक्षाचे काम करणाऱ्या शिवसैनिकांमध्ये मोठया प्रमाणात नाराजी पसरली होती, त्याचाच फटका सेनेला बसला असावा असे बोलले जाते. अल्प जागा मिळाल्याने शिवसेनेचा सोशल इंजिनीयरिंगचा प्रयोग फसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

बहुमताचा 48 चा आकडा गाठणे सेनेला मुश्‍कील झाले आणि धनुष्य बाणांचा वेध 22 जागा मिळविण्यापुरता मर्यादित राहिला. जैन, गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीय समाजावर आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पगडा कायम असल्याचे भाजपला मिळालेल्या यशामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मीरा भाईंदर मधील परिस्थिती पाहता विरोधकांनी भाजपपेक्षा आमदार नरेंद्र मेहता यांच्या कार्यपध्दतीवर टीका केली. एवढेच नव्हे तर मेहता यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. त्यामुळे भाजप हा पक्ष निवडणुकीत प्रमुख असला तरी टार्गेट नरेंद्र मेहताच होते. अशा कठीण परिस्थितीत मीरा भाईंदर महापालिकेत भाजपला एकहाती सत्ता मिळवून देण्यात नरेंद्र मेहता यांचा सिंहांचा वाटा मानला जात आहे. 

निवडणूक निकाल 2019 - भाजप 61 शिवसेना 22 कॉंग्रेस 10 अपक्ष 2 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com