Ministers have no time to solve garbage issue in Pune | Sarkarnama

मंत्र्यांनाच वेळ नाही, मग कचराप्रश्‍न सुटणार कसा? -सुप्रिया सुळे

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 5 मे 2017

स्वच्छ भारत अभियाना'चा पंतप्रधान कार्यालयाकडून मोठा गाजावाजा केला जातो; परंतु स्वच्छतेच्याच विषयाकडे आता काणाडोळा होत असल्याचे पुणेकरांसमोर आले आहे. कचऱ्याची समस्या निर्माण झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा पुणे दौरा केला. मात्र, या प्रश्‍नाबाबत बैठक घेण्यास त्यांना वेळ मिळाला नाही.

पुणे - शहरापुढील कचऱ्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी सहकार्य करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी आहे; परंतु, त्यासाठी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट यांना वेळ नाही. मग हा प्रश्‍न सुटणार कसा? असा प्रश्‍न राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिकेतील पत्रकार परिषदेत काल उपस्थित केला. कचऱ्याच्या प्रश्‍नावर राष्ट्रवादी काँग्रेस राजकारण करीत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अभिनेता कपिल शर्माने ट्विटरवर टॅग केले, तर मुख्यमंत्री लगेचच त्याची दखल घेतात; परंतु गेल्या 21 दिवसांपासून शहरातील कचरा समस्येने उग्र रूप धारण केले तरी मुख्यमंत्री त्याकडे दुर्लक्ष करतात. या विषयावर त्यांना ट्विटरवर तीन वेळा टॅग केले तरी काही होत नाही. पालकमंत्री गिरीश बापटही उपलब्ध नाहीत. त्यामुळे अखेर पंतप्रधानांशीच संपर्क साधावा लागला, असेही सुळे यांनी स्पष्ट केले.

'स्वच्छ भारत अभियाना'चा पंतप्रधान कार्यालयाकडून मोठा गाजावाजा केला जातो; परंतु स्वच्छतेच्याच विषयाकडे आता काणाडोळा होत असल्याचे पुणेकरांसमोर आले आहे. कचऱ्याची समस्या निर्माण झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा पुणे दौरा केला. मात्र, या प्रश्‍नाबाबत बैठक घेण्यास त्यांना वेळ मिळाला नाही. फुरसुंगी, उरुळी देवाची येथील ग्रामस्थ कचरा डेपोमुळे नरकयातना भोगत आहेत, त्यामुळे त्यांचे प्रश्‍न समजावून घेऊन ते सोडवले पाहिजेत. त्यासाठी सहकार्य करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस तयार आहे; परंतु चर्चा करायची कोणाशी, हा प्रश्‍न असल्याचे सुळे यांनी सांगितले.

कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी शहरातील कचरा शहरातच जिरविला पाहिजे, त्यासाठी शहराच्या चारही बाजूंना कचरा डेपो निर्माण केले पाहिजेत. प्रभागनिहाय प्रकल्पांची उभारणी केल्यास हा प्रश्‍न निश्‍चितच सुटेल. बारामती, दौंड, इंदापूर, सासवड, जेजुरी, भोर ही गावे आता छोटी शहरे होत आहेत, त्यामुळे तेथे कचरा टाकून प्रश्‍न सुटणार नाही, तर त्या-त्या गावांतील कचरा तेथेच जिरविला पाहिजे. जगभर ही संकल्पना रूढ झाली असताना स्मार्ट सिटी झालेल्या पुण्यातही तिची अंमलबजावणी व्हायला हवी, अशी अपेक्षा सुळे यांनी व्यक्त केली.

 

 

संबंधित लेख