Minister Sambhaji Patil Nilangekar drives Bus but corporators remain absent | Sarkarnama

मंत्री निलंगेकरांनी बस चालवून दाखवली तरीही  नगरसेवकांची नाराजी कायमच

सरकारनामा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

यावेळी बोलताना संभाजी पाटील निलंगेकर नगरसेवकांना उद्देशून म्हणाले ,हे बंड थंड झाले आहे. बंड करणे हे लोकशाहीचे लक्षण आहे; पण त्याचा अतिरेक होऊ नये. सध्या मी लातूरकरांसारखाच वागत आहे. निलंग्यासारखी भूमिका घेतलेली नाही, असे म्हणत पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी बंड करणाऱ्या नगरसेवकांना एक प्रकारे इशाराच दिला आहे.

लातूर:  लातूर महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील नगरसेवकांनी गेल्या काही दिवसांपासून बंडाची भूमिका घेतली आहे. लातूर भाजपची गाडी नगरसेवकांच्या अंतर्गत मतभेदांमुळे सध्या भरकटू लागली आहे . महापालिकेच्या वतीने तीन नवीन सीटी बस सुरू  करण्याच्या कार्यक्रमात मंत्री असलेल्या संभाजी पाटील यांनी स्वतः बस चालवून दाखवली पण सत्ताधारी ३९ नगरसेवकांपैकी ३० जणांनी गैरहजर राहून आपली नाराजी दाखवून दिली .  

लातूर  महापालिकेच्या वतीने तीन नवीन सीटी बस सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचे उद्‌घाटन पालकमंत्री निलंगेकर यांच्या हस्ते मंगळवारी (ता. 7) झाले. यावेळी श्री. निलंगेकर यांनी स्वतः सीटी बस चालवली. यावेळी महापौर सुरेश पवार, आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, अपर पोलिस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे, भाजपचे शहराध्यक्ष शैलेश लाहोटी, नगरसेवक शैलेश स्वामी, संगीत रंदाळे, सुनील मलवाड आदी उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या झालेल्या स्थायी समितीची सभा व सर्वसाधारण सभेवर सत्ताधारी भाजपच्याच नगरसेवकांनी बहिष्कार टाकला होता. या बहिष्काराला महापौरावरील नाराजी, स्थायी समिती सभापतीवरील नाराजी, अर्थकारण असे वेगवेगळे पदर होते. यात महापालिकेपेक्षा पक्षाचीच बदनामी अधिक झाली. हे लक्षात आल्यानंतर श्री. निलंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी सर्व नगरसेवकांची हजेरी घेतली होती. या पार्श्वभूमीवर  मंगळवारी श्री. निलंगेकर यांच्या हस्ते महापालिकेत सीटी बसचे उद्‌घाटन झाले.  

पालकमंत्री निलंगेकर यांच्या हस्ते आज सीटी बसचे उद्‌घाटन होते. यावेळी सत्ताधारी 39 नगरसेवकांनी उपस्थितीत राहणे अपेक्षित होते; पण यात सुमारे तीस नगरसेवक गैरहजर राहिले. यात उपमहापौर, स्थायी समितीच्या सभापतींचाही समावेश होता. त्यामुळे नगरसेवकांत अजूनही खदखद सुरूच आहे, असे स्पष्ट होत आहे. तर दुसरीकडे विरोधक असलेल्या कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी देखील या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख