धनगर समाजाने आपले उपद्रवमूल्य वाढवायला हवे - राजशिष्टाचार मंत्री  राम शिंदे 

 धनगर समाजाने आपले उपद्रवमूल्य वाढवायला हवे - राजशिष्टाचार मंत्री  राम शिंदे 

बारामती : धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासन कटीबध्द आहे, प्रश्न सुटला पाहिजे ही आमची भूमिका असली तरी हा प्रश्न लवकर सोडविण्यासाठी धनगर समाजाने आपले उपद्रवमूल्य वाढवायला हवे, असा जाहिर सल्ला राम शिंदे यांनी येथे  दिला. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 292 व्या पुण्यतिथीनिममित्त बारामतीत आयोजित कार्यक्रमात राम शिंदे  बोलत होते. राजशिष्टाचार मंत्री राम शिंदे, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार दत्तात्रय भरणे, प्रकाश शेंडगे, आर.जे. रुपनवर, रामराव वडकुते, बाळासाहेब गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. 

धनगर समाजाला आरक्षण मिळायला हवे ही सर्वपक्षीय भूमिका आहे या प्रश्नाबाबत सर्वांनी एकत्र बसून हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करायला हवा, अशी अपेक्षा विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी व्यक्त केली. 

गिरीश बापट यांनीही धनगर समाजाला आरक्षण दिले पाहिजे, ही शासनाची भूमिका असून आम्ही त्या साठी कटीबध्द आहोत, असे नमूद केले. राम शिंदे यांनीही आरक्षणासाठी असे प्रयत्न करायचे आहेत की हे आरक्षण पुढे जाऊन न्यायालयात टिकायला हवे असे सांगितले. या साठी सरकारने ठोस पावले उचलल्याचे ते म्हणाले. 

अजित पवार म्हणाले, ज्या ज्या समाजाने आरक्षणाची मागणी केली आहे त्या केंद्राकडे सोपवू अशी माझी भूमिका होती इतर समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता धनगर समाजच नव्हे तर ज्यांच्या मागण्या आहेत त्यांना आरक्षण दिले पाहिजे. या बाबत केंद्रानेच आता लवकर निर्णय घेण्याची गरज आहे. 

या प्रसंगी जिल्हा परिषदेचे  अध्यक्ष विश्वास देवकाते व सौ. राजश्री देवकाते यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थी तसेच स्पर्धा परिक्षेत यश प्राप्त विद्यार्थ्यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात विश्वास देवकाते यांनी बारामतीत अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बसविण्याची मागणी केली.

 धनगर आंदोलनात ज्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याचीही त्यांनी मागणी केली. प्रियदर्शिनी कोकरे हिनेही या प्रसंगी मनोगत व्यक्त केले. प्रा. ज्ञानदेव बुरुंगले यांनी सूत्रसंचालन केले, सनी देवकाते यांनी आभार मानले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com